राज्य विधिमंडळाचे उद्यापासून अधिवेशन; विरोधक चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 06:42 AM2021-02-28T06:42:44+5:302021-02-28T06:42:57+5:30
अधिवेशनातील रणनीती ठरविण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांची बैठक रविवारी दुपारी होणार असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आयोजित चहापानावर विरोधक बहिष्कार टाकतील, अशी दाट शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू द्यायचे नाही, अशी भूमिका विरोधी पक्ष भाजपने घेतल्याने सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून रणकंदन अटळ दिसत आहे.
केवळ राठोडच नव्हे, तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ज्यांच्या जावयाला ईडीने अटक केली ते अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, पोलीस मारहाण प्रकरणी मंत्री यशोमती ठाकूर, एका कार्यकर्त्याला घरी आणून मारहाण केल्याचा आरोप असलेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे विषयही आम्ही अधिवेशनात आणू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. विरोधकांच्या गोंधळाला सडेतोड उत्तर देण्याची तयारी महाविकास आघाडीने चालविली असून, गोंधळ न करता चर्चा करा, असे आव्हान विरोधकांना दिले आहे.
अधिवेशनातील रणनीती ठरविण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांची बैठक रविवारी दुपारी होणार असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आयोजित चहापानावर विरोधक बहिष्कार टाकतील, अशी दाट शक्यता आहे. राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये विविध मुद्द्यांवर सुरू असलेला संघर्ष लक्षात घेता भाजप चहापानाला जाईल, असे दिसत नाही. कोरोनाच्या काळात देण्यात आलेली वाढीव वीज बिले, शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, मराठा आरक्षण, राज्यातील कायदा व सुव्यवस्था या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.
संजय राठोड यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. नाहीतर रस्त्यावर आणि सभागृहातही संघर्ष अटळ आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून कोरोनातील भ्रष्टाचारापर्यंत अनेक मुद्दे आमच्याकडे आहेत.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
संजय राठोड यांच्याबाबत जे काही घडत आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनभिज्ञ नाहीत. ते डोळे मिटून बसलेले नाहीत. मुख्यमंत्री हे मिस्टर सत्यवादी आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत आणि कोणालाही पाठीशी घालणार नाहीत.
- खा. संजय राऊत, शिवसेना नेते