Tauktae Cyclone: "ते आले अन् निघून आले; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 12:54 PM2021-05-21T12:54:24+5:302021-05-21T12:58:18+5:30
Tauktae Cyclone: भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे.
रत्नागिरी/ मुंबई: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. याचपार्श्वभूमीवर चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) आज कोकण दौऱ्यावर आहेत. सर्वप्रथम त्यांनी रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला. यानंतर आता मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे. त्यावर चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलो नाही. मला त्याची गरज वाटत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आता भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, ते आले...अन् न पाहताच निघून गेले. मुख्यमंत्र्यांकडून केवळ एका ठिकाणी फेरफटका, वादळग्रस्तांची भेट नाही, नुकसानीचा पाहणी दौरा रद्द, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. कोकणी माणसाने समजून जावं शिवसेना आपल्याला भावनिक करून संपायलाच निघाली आहे, असा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.
ते आले... अन् न पाहताच निघून गेले,
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
मुख्यमंत्र्यांकडून केवळ एका ठिकाणी फेरफटका, वादळग्रस्तांची भेट नाही, नुकसानीचा पाहणी दौरा रद्द.
जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो. कोकणी माणसाने समजून जावं शिवसेना आपल्याला भावनिक करून संपायलाच निघाली आहे.
वादळामुळे उध्वस्त झालेल्या कोकणी माणसाला खरी गरज होती ती त्याचे दुःख जाणून घेण्याची. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तेच केले. शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकण भेटीचा मुहूर्त शोधेपर्यंत फडणवीस आले, संकट सोसलेल्या इथल्या लोकांना भेटले आणि त्यांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतली, असं निलेश राणे यांनी म्हटले आहे.
वादळामुळे उध्वस्त झालेल्या कोकणी माणसाला खरी गरज होती ती त्याचे दुःख जाणून घेण्याची. विरोधीपक्ष नेते @Dev_Fadnavis जी यांनी तेच केले. शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकण भेटीचा मुहूर्त शोधेपर्यंत फडणविसजी आले, संकट सोसलेल्या इथल्या लोकांना भेटले आणि त्यांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतली. pic.twitter.com/XTgRJtzzWs
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ भीषण होते. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. जे काही नुकसान झाले आहे, केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देणार आहोतच आणि राज्य सरकार म्हणून आणखी जे काही करता येणं शक्य हवं ते केलं जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच आम्ही केंद्रानेही अधिकाधिक मदत करावी म्हणून विनंती करीत आहोत. पंतप्रधान संवेदनशील आहेत, आम्हाला राजकारण करायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सागरी किनार पट्टीच्या भागात कायमस्वरूपी काही सुविधा उभारणे गरजेचे आहे. त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत करावी. वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसेच कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
Tauktae Cyclone: पंतप्रधान संवेदनशील, केंद्राने अधिकाधिक मदत करावी; उद्धव ठाकरेंची दाद अन् साद https://t.co/DU9VtzSoLv@ShivSena@CMOMaharashtra@OfficeofUT@BJP4Maharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2021