ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:07 PM2021-06-08T18:07:46+5:302021-06-08T18:08:19+5:30
दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते.
दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटतात तेव्हा ठाकरे-मोदी भेटीची चर्चा तर होणारच, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
"दिल्लीत झालेली भेट नक्कीच महत्वाची होती. मराठा आरक्षणाचा विषय तात्काळ सोडवावा अशी मुख्य मागणी आहे. कारण आता तो विषय केंद्राच्या अखत्यारित आहे. त्यासोबतच पिक विमा योजना, बढतीतील आरक्षण आणि इतर महत्वाच्या विषयांवरही चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली असल्याचं मला कळालं आहे. पंतप्रधानांनी सर्व विषय ऐकून आणि समजून घेतले आहेत", असं संजय राऊत म्हणाले.
मोदी-ठाकरेंमध्ये 'वन टू वन' चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक चर्चा झाल्याचंही यावेळी सांगण्यात येत आहे. याबाबत विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. "होय, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धातास वन टू वन चर्चा देखील झाली. दोन्ही चर्चा या अतिशय महत्वाच्या होत्या हे एवढंच मी सांगू शकतो", असं संजय राऊत म्हणाले.