वसंत भोसले चेन्नई : तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकांचे चित्र सोमवारी स्पष्ट होत आहे. त्यानंतर केवळ तेरा दिवसांच्या प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. कालअखेरच्या दिवसापर्यंत ६ हजार ६६५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये ९८६ महिलांच्या अर्जांचा तर तीन तृतीयपंथींच्या अर्जांचा समावेश आहे. कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूकही होत असून तेथे बावीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असले तरी सोमवारी माघारीचा एकच दिवस आहे, शिवाय छाननी तसेच माघार घेण्याची मुदत संपताच चित्र स्पष्ट होईल. बहुसंख्य मतदारसंघांत बहुरंगी लढती अपेक्षित आहेत.
द्रविड मुन्नेत्र कळघम आघाडी आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आघाडी यांच्यातच प्रमुख लढत आहे. शिवाय नव्यानेच राजकारणात उतरलेल्या अभिनेता कमल हसन यांच्या नेवृत्वाखालील पक्षाची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. सर्वाधिक ९५ उमेदवारी अर्ज करूर मतदारसंघात दाखल झाले आहेत. सेलम जिल्ह्यातील ईडाप्पडी मतदारसंघात मुख्यमंत्री ई.के. पलानीस्वामी यांच्यासह ३८ अर्ज दाखल झाले आहेत.
उद्या चित्र स्पष्ट होणार सर्व प्रमुख पक्षांनी प्रचार सुरू केलेला असला तरी सोमवारी चित्र स्पष्ट झाल्यावर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. २३ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान केवळ तेरा दिवस प्रचाराला मिळणार आहेत आणि ६ एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात तसेच कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. मतमोजणी दि. २ मे रोजी होणार आहे. अण्णा द्रमुकची भाजपशी तर द्रमुकची काँग्रेस तसेच डाव्या पक्षांशी आघाडी आहे.