नवी दिल्ली - भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर कोलकाता दौर्यात दगडांनी हल्ला करण्यात आला. यावरून भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर आरोप केला आहे. तसेच, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मात्र सोशल मीडियावर नड्डांवरील हा हल्ला बनावट असल्याचा दावा केला आहे.
राज्यात दाखल होणारे नेते आपापल्या उच्च दर्जाची सुरक्षा यंत्रणा सोबत घेऊन येतात. मात्र तरीही नेत्यांवर हल्ला कसा होऊ शकतो असा सवालही मोईत्रा यांनी उपस्थित केला आहे. महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतच एक ट्विट केलं आहे. "महाविद्यालयांच्या BYOB (ब्रिंग युअर ओन बॉटल) बद्दल ऐकलं होतं... भाजपा नेते पश्चिम बंगालमध्ये दररोज BYOS (ब्रिंग युअर ओन सिक्युरिटी) सोबत दाखल होतात. राज्यात दौऱ्यावर येणारा भाजपाचा कोणीही नेता आपल्यासोबत येताना सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि केंद्रीय दलाच्या जवानांना घेऊन येतो. लज्जास्पद 'बनावट' हल्ल्यांपासून ते तुमची सुरक्षा करू शकले नाहीत" असं महुआ मोईत्रा यांनी म्हटलं आहे.
'उठसूठ कोणीही बंगालमध्ये येतंय, चड्डा, नड्डा फाड्डा, गड्डा आलेत'; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
ममता बॅनर्जी यांनी हे सगळं नाटक आहे. माध्यमाद्वांरे भाजपा नागरिकांना सभेपर्यंत आणू शकली नाही. यासाठीच हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडीओ कसे काय तयार केले? बीएसएफ आणि सीआरपीएफची सुरक्षा असताना तुम्हाला कोणी हातही लावू शकेल का? असं ममता यांनी म्हटलं आहे. तसेच "देशाच्या गृहमंत्र्यांना काही काम नाही. उठसूठ पश्चिम बंगालमध्ये येतात. कधी कोण नेता तर कधी मंत्री येतात. आता चड्डा, नड्डा, फाड्डा, गड्डा आलेत. त्यांना राज्यात जनतेचं कुठलंही समर्थन नाही. यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना नाटक करायला लावत आहे" असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला आहे.
"हिटलर हा अशाच प्रकारे 'हिटलर' बनला. ते प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत आहेत. आपले स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत आणि माध्यमांकडे पाठवत आहेत. माध्यमांकडून हे व्हिडिओ दिवसभर चालवले जात आहेत. त्यांनी माध्यमांनाही विकत घेतलं आहे" असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. यासोबत ममता बॅनर्जी यांनी नवीन संसद भवनच्या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला आहे. नवीन संसद भवनची आता काहीच गरज नव्हती. हा पैसा शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली.