गृहमंत्री अमित शहा यांचे नेहरूंवर राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप :काँग्रेसचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 03:49 PM2019-07-01T15:49:11+5:302019-07-01T15:55:20+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेले आरोप राजकीय द्वेषापोटी केलेले आहेत. त्यांच्या या विधानाचा पुणे शहर काँग्रेसने पत्रक काढून निषेध केला.
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेले आरोप राजकीय द्वेषापोटी केलेले आहेत. त्यांच्या या विधानाचा पुणे शहर काँग्रेसने पत्रक काढून निषेध केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने काश्मिरमध्ये अतिक्रमण केले त्यावेळी नेहरूंनी युध्द बंदी जाहिर केली. त्यामुळे पाकिस्तानने काश्मिरचा भाग बळकावला. युध्दबंदीचा निर्णय घेण्याआधी नेहरूंनी तात्कालिन उपपंतप्रधान आणि केंद्रिय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना विश्वासात घेतले नाही असे वक्तव्य शहा यांनी केले होते. त्यावर आता काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘शहा हे १९४७ मध्ये जम्मू कश्मिरमध्ये काय परिस्थिती होती याची माहिती न घेता बेताळ वक्तव्य करीत आहेत. नेहरू यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेऊन ११ वर्षे तुरूंगवास भोगला. त्यांच्या कारकिर्दीत आय.आय.एम., आय.आय.टी., भ्राका नांगल सारखे धरण प्रकल्प, एन.डी.ए., इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, हिंदूस्तान ॲरोनॉटिक्स लि., बाबा ॲटोमिक रिसर्च सेंटर इत्यादी संस्था उभे राहिले. या नेत्याच्या दूरदृष्टीकोनामुळे भारत देश स्वावलंबी झाला. शहा यांना गुजरातच्या दंगलीमध्ये आरोपी म्हणून तडीपार करण्यात आले आणि त्यांना तुरूंगात जावे लागले अशा व्यक्तिने नेहरूंच्या विरूध्द जे वक्तव्य केले ते भारतीय संस्कृतीला अनुसरून नाही. जम्मू काश्मिच्या त्यावेळेच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती न घेता केवळ नेहरू - गांधी कुटूंबियांवर असलेल्या द्वेषामुळे खोटे आरोप करून देशाची जनतेची दिशाभुल करीत आहे. शहा यांनी नेहरूंजीबद्दल केलेल्या खोट्या आरोपांचे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तीव्र शब्दात निषेध करीत आहे.’’