उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील काही नेते स्वपक्षाला रामराम करुन दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत तर काहीजण पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. याच काळात जागेश्वरचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष गोविंद सिंह कुंजवाल यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपाच्या गोटात खळबळ माजली आहे.
आमदार गोविंद सिंह कुंजवाल म्हणाले की, आगामी १५ दिवसांत भाजपाचे(BJP) ६ आमदार काँग्रेस(Congress) पक्षात प्रवेश करतील. संपूर्ण राज्यात काँग्रेसची लाट आहे. निवडणुकीनंतर काँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करेल असा दावा त्यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातवरण ढवळून निघालं आहे. विद्यमान आमदार भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. परंतु गोविंद सिंह कुंजवाल यांनी कुठल्याही भाजपा आमदाराचं नाव उघड केले नाही.
राज्यातील जनतेला काँग्रेसकडून अपेक्षा
जागेश्वर आमदार कुंजवाल यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. डबल इंजिनचं सरकार असूनही राज्याचा विकास झाला नाही. आजही राज्यातील जनतेला मुलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. जी विकास कामं काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झाली तीदेखील पुढे घेऊन जाता आलं नाही. राज्यातील जनतेला काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत. लोकं भाजपाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. बेरोजगारी आणि महागाई यामुळे जनता त्रस्त असून पुढील निवडणुकीत भाजपाला चांगलाच धडा मिळेल. कोरोना काळात गरीब एकवेळच्या अन्नासाठी व्याकुळ होते. जनतेच्या नाराजीमुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडणुकीत जिंकू की नाही या चिंतेत आहेत. त्यामुळेच भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.
अलीकडेच यशपाल आर्य यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला
पुष्कर सिंह धामी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले यशपाल आर्य(Yashpal Arya) यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राज्यात काही महिन्यांवर निवडणुका आल्या असताना यशपाल आर्य यांनी भाजपाला धक्का दिला. यशपाल आर्य यांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या एका कॅबिनेट पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपा सरकारवर नियुक्तीचं संकट आहे. त्यामुळे भाजपामध्ये आणखी काही आमदार नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.