मुंबई – राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकारण रंगू लागलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वायप्लस एक्स्कॉर्ट दर्जाची सुरक्षा देण्यात आली, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, राम कदम या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी राजकारण करून विरोधकांची सुरक्षा कमी करण्याचा घाट घालतंय, परंतु आमचा आवाज बुलंद राहणार असं विरोधक म्हणत आहेत, तर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला जातो, त्यानंतर कोणाला सुरक्षा द्यायची, कोणाची सुरक्षा वाढवायची याबाबत निर्णय घेतले जातात असा पवित्रा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे.
यातच सुरक्षा देण्याच्या यादीत शिवसेनेच्या युवासेनेचे वरूण सरदेसाई यांचे नाव असल्यानं भाजपानं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ज्या लोकांच्या जीविताला धोका असतो अशांना सुरक्षा दिली जाते, मात्र या यादीवरून वाटते महाविकास आघाडीने विरोधकांची सुरक्षा कमी करून राजकारण केलं आहे असं भाजपाने म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपा आमदार नितेश राणे यांनी वरूण सरदेसाई यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरून ठाकरे सरकारला चिमटा काढला आहे.
याबाबत नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारने युवासेनेच्या वरूण सरदेसाईंना सुरक्षा देण्याचा घेतलेला निर्णय योग्य पाऊल आहे, कारण त्याला खरोखरचं सुरक्षेची गरज आहे. कारण वरूण सरदेसाईचा मंत्रालयात फिरणाऱ्या फाईल्सवर जेव्हापासून अंकुश आला आहे तेव्हापासून प्रशासनातील काही अधिकारी त्याच्यावर प्रचंड रागावलेले आहेत असं ऐकण्यात आलं आहे, त्यासाठी त्याला सुरक्षेची नितांत गरज आहे असा टोला नितेश राणेंनी शिवसेनेला लगावला आहे.
कोण आहेत वरूण सरदेसाई?
वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचा मुलगा आहे. त्यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वरूण सरदेसाई यांचा वावर मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर वाढलेला आहे. आदित्य ठाकरेंना विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी पहिल्यांदा वरूण सरदेसाई यांनीच केली होती. त्याचसोबत ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरूण सरदेसाईंचा मोठा वाटा होता.