नवी दिल्ली – आम्ही भाजपाच्या कट्टर विरोधी असणाऱ्या व्यक्तींचाही मोकळ्या मनानं आदर करतो. भारतरत्न ते पद्म पुरस्कार ही याची उदाहरणे आहेत. केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यात आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जातं. त्यांच्यावर हल्ला केला जातो. त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला जातो. पण ते त्यांच्या विचारसरणीवर ठाम असतात. ते अटळ राहतात अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे.
भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी मोदी म्हणाले की, आपल्या पक्षाचे जे संस्कार आहेत, त्यांचा राजकीय अस्पृश्यतेवर विश्वास नाही. म्हणूनच सरदार पटेल यांना समर्पित स्ट्यॅचू ऑफ युनिटी बनवण्याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणूनच बाबासाहेबांसाठी पंचतीर्थ बांधण्याचा आम्हाला अभिमान आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत कार्यकर्ते भाजपाला बळ देतात. लोकांमध्ये काम करतात आणि संघटनेचे बळ वाढवतात. आपल्या जीवन, आचरण आणि प्रयत्नातून ते लोकांची मने जिंकण्यासाठी काम करत राहतात. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे आज भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आज भाजपाशी ग्रामीण भागातील प्रत्येक गरीब व्यक्ती जोडला जात आहे. कारण त्यांना पहिल्यांदा अंत्योदय साकारताना दिसत आहे. आज २१ व्या शतकाला साकारणारा तरूण भाजपासोबत आहे. भाजपाच्या तत्वांसोबत आहे. भाजपाच्या प्रयत्नांसोबत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तसेच गेल्या वर्षी कोरोनानं संपूर्ण देशासमोर एक अभूतपूर्व संकट निर्माण केले. तेव्हा तुम्ही सर्वजण पुढे येऊन आपले सुख आणि दु:ख विसरून देशवासियांची सेवा करत राहिलात. तुम्ही सर्वांनी सेवा हेच संघटन असा संकल्प करून त्यासाठी काम केले. देशातील कदाचित असे कोणतेही राज्य किंवा जिल्हा असेल तिथे पक्षासाठी २-३ पिढ्या खर्च केलेली नाहीत. स्थापना दिनानिमित्ताने जनसंघ ते भाजपापर्यंतच्या राष्ट्र सेवेच्या या यज्ञात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी नमन करतो. आज आपल्या पक्षाच्या गौरवशाली प्रवासाला ४१ वर्ष पूर्ण होत आहेत. सेवा आणि समर्पणासह एखादा पक्ष कशाप्रकारे कार्य करतो याची ही ४१ वर्ष साक्षीदार आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.