कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आले आहे. दुसऱ्या टप्प्यात गुरुवार, १ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने आज मंगळवारी प्रचाराच्या सभांनी घमासान होणार होणार आहे.ममता बॅनर्जी यांनी निवडणूक जाहीर झाल्यावर अचानकपणे नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे खंदेसमर्थक अधिकारी सुवेंदु यांनी २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत येऊन मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. सुवेंदु यांनीच बंडखोरी करुन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंदीग्राममधून पुन्हा एकदा नशीब आजमावण्याचे ठरविले. अधिकारी सुवेंदु यांच्या भाजप प्रवेशाने गृहमंत्री अमित शहा यांनी हा ममता बॅनर्जी यांचा मोठा धक्का आहे, असे जाहीर केले होते. दरम्यान, आपल्या कोलकत्यातील भवानीपूर मतदारसंघाऐवजी नंदीग्राममधून अधिकारी सुवेंदु यांनाच आव्हान देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला. त्यामुळे पश्चिम बंगालमधील ही निवडणूक सर्वात प्रतिष्ठेची मानली जाऊ लागली आहे. सुवेंदु यांनी मागील निवडणूक तृणमुल काँग्रेसतर्फे लढविताना १ लाख ३४ हजार ६२३ मते घेऊन भाकपचे अब्दुलकबीर शेख यांचा ८१ हजार ४९० मतांनी पराभव केला होता.
नंदीग्राममध्ये आज प्रचारसभा, शक्तिप्रदर्शनाचे धमासान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 4:22 AM