West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याही मोठ्या सभा पश्चिम बंगालमध्ये सुरू आहेत. त्यात पंतप्रधान मोदींच्या एका प्रचार सभेत एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपाठीवर असताना एक भाजप कार्यकर्ता मोदींच्या पाया पडण्यासाठी पुढे सरसावला. त्याचवेळी मोदींनी थेट त्या कार्यकर्त्याचेच पाय धरले आणि त्यालाही वाकून नमस्कार केला. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओच भाजपनं ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे.
नेमकं काय घडलं?पश्चिम बंगालच्या कांथीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्थानिक भाजप मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. तेव्हा अचानक एक भाजप कार्यकर्ता उठला आणि त्यानं मोदींना वाकून नमस्कर करत त्यांच्या पाया पडला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या कार्यकर्त्याला वाकून नमस्कार करत असं करत जाऊ नका, असं सूचित केलं.
भाजपनं या संदर्भात एक ट्विट केलंय. "भाजपा एक अशी सुसंस्कृत संघटना आहे की जिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल सन्मान आणि आदर आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक रॅली दरम्यान व्यासपीठावरील एका कार्यकर्त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाला स्पर्श केला आणि नमस्कार केला. तर मोदींनीही या कार्यकर्त्याला वाकून नमस्कार केला", असं भाजपानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.