कोलकाता - काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या पक्षांनी भाजपच्या सांप्रदायिक तसेच फुटिरतावादी राजकारणाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साथ द्यावी, असे आवाहन तृणमूल काँग्रेसने केले आहे. येथे एप्रिल-मे महिन्यात 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार सौगत रॉय यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले, ''जर डावे आणि काँग्रेस खरोखरच भाजपविरोधात आहेत, तर त्यांनी भाजपच्या सांप्रदायिक तथा फुटिरतावादी राजकारणाविरोधातील लढाईत ममता बॅनर्जी यांना साथ द्यायला हवी.'' एवढेच नाही, तर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी याच भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या खरा चेहरा आहेत, असेही रॉय म्हणाले.
यावेळी रॉय यांनी दावा केला, की केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील सरकारने सुरू केलेली एकही योजना यशस्वी झाली नाही. तसेच, तृणमूल काँग्रेसचा विकासासंदर्भात योग्य टीका करण्यावर विश्वास आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय स्वरूप घेतलेल्या पशू-तस्करीसंदर्भात बोलताना रॉय म्हणाले, हे रोखण्याची जबाबदारी राज्य पोलिसांची नसून, सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) आहे. बीएसएफ, देशाच्या सीमांचे संरक्षण करत असते आणि ते केंद्र सरकारच्या आधीन आहेत. यामुळे सीमेवरील पुश-तस्करी रोखणे, ही पोलिसांची नाही, तर त्यांचीच जबाबदारी आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यावर निशाणासाधत रॉय म्हणाले, ''वेगवेगळ्या ठिकाणी भोजन करण्याऐवजी त्यांनी सीमेवर जाऊन, बीएसएफ अपले काम व्यवस्थित करते की नाही, हे बघायला हवे होते." गेल्या महिन्यात शाह पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले होते.
अनेक नेते सोडतायत टीएमसीची साथ -पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या मे महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र, त्यापूर्वी टीएमसीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सर्वप्रथम सुवेंदू अधिकारी यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत पक्ष सोडला आणि ते भाजपत दाखल झाले. त्यांच्याशिवाय त्यांचे अनेक समर्थक आणि टीएमसी आमदारही पक्ष सोडून भाजपत गेले.
पक्षात अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांचा दबदबा वाढल्यापासून पक्षाचे काम व्यवस्थितपणे सुरू नाही, असा आरोप टीएमसीला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांनी केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले होते, की काही जणांना नेल्याने त्यांच्या पक्षावर कसलाही परिणाम होणार नाही. बंगालमध्ये टीएमसीचेच सरकार बनेल.