West Bengal Election: भाजपाला इनकमिंग भोवणार; कोलकातामध्ये कार्यकर्त्यांकडून आपल्याच नेत्यांवर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 07:44 AM2021-03-17T07:44:54+5:302021-03-17T07:45:25+5:30
West Bengal Election 2021: भाजपाने सिंगूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना तिकिट दिले आहे. याला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal assembly elections) भाजपाला (BJP) उमेदवारांचे इनकमिंग चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. भाजपाने सिंगूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे (TMC) माजी आमदार रवींद्रनाथ भट्टाचार्य यांना तिकिट दिले आहे. याला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे. यामुळे निवडणुकीत दगाफटका नको म्हणून या कार्यकर्त्यांना समजाविण्यासाठी नेत्यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त सिंगूरच नाही तर अनेक जागांवर भाजपाचे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारावरून रोष आहे. तिकिट वाटपावरून स्थानिक नेते नाराज आहेत. यामुळे कोलकाताच्या पक्षाच्या कार्यालयावर भाजपाच्याच नेत्यांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना घडली आहे. (BJP Workers angry on outsider candidates, who came from Trunmul Congress.)
रविवारी भाजपाने भट्टाचार्य यांना सिंगूर येथून उमेदवारी घोषित केली. तीन वेळा भट्टाचार्य़ या जागेवरून आमदार होते. मात्र, तृणमूलने यावेळी त्यांना तिकिट न दिल्याने त्यांनी 8 मार्चला भाजपाचा रस्ता धरला. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले की, भट्टाचार्य यांना पक्षाचा उमेदवार म्हणून स्वीकार करणार नाही. जेव्हा ते आमदार होते तेव्हा अनेक भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती. तसेच अटकही करून नाहक त्रास देण्यात आला होता.
भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि पश्चिम बंगालचे सह प्रभारी अरविंद मेनन यांनी सांगितले की, या मुद्द्यावरून पक्षाच्या स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा करून उपाय शोधण्याचे काम सुरु आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या चिंतांबाबत गंभीर आहे. राज्याचे नेते सिंगूरमध्ये यावर चर्चा करत आहेत. ही परिस्थिती अन्य मतदारसंघांतही आहे.
भाजपाला रिस्क नकोय....
राज्यातील एका मोठ्या नेत्याने सांगितले की, भाजपाला कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घ्यायची नाहीय. अनेक जागांवर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. त्यांच्यातील राग हा विधानसभा निवडणूक प्रभावित करू शकतो. भाजपामध्ये तृणमूलमधून प्रवेश करणाऱ्य़ा आणि त्यांना तिकिट दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. एवढेच नाही तर भाजपा खासदार लॉकेट चॅटर्जी यांना चुंचुड़ा मतदारसंघातून तिकिट दिल्याने देखील नाराजी आहे.
स्वपन दासगुप्तांचा राज्यसभेचा राजीनामा
स्वपन दासगुप्ता हे राज्यसभेचे नामांकित सदस्य आहेत. भारतीय संविधानानुसार त्यांच्या प्रतिष्ठेचा हवाला देत तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विट करून पहिल्यांदा यावर आक्षेप घेतला. राज्यघटनेच्या 10 व्या तरतुदीनुसार जर एखादा राज्यसभेचा नामांकित सदस्य शपथ घेतल्यानंतर आणि 6 महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर जर कोणत्याही राजकीय पक्षात जात असेल तर त्याचे राज्यसभा सदस्यपद अयोग्य घोषित केले जाईल. असे असताना दासगुप्ता यांना एप्रिल 2016 मध्ये शपथ देण्यात आली होती. आता त्यांना भाजपात जाण्यामुळे अयोग्य घोषित केले जायला हवे, असे मोईत्रा यांनी म्हटले. यावरून राज्यसभेत गदारोळ होताच स्वपन दासगुप्ता यांनी राज्यसभेचे सभापती एम. एम. वेंकय्या नायडू यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला आहे.