West Bengal Election: भाजपत प्रवेश करताच मिथुन चक्रवर्तींना Y+ सुरक्षा; गृह मंत्रालयाकडून मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 08:58 PM2021-03-10T20:58:21+5:302021-03-10T21:02:55+5:30
West Bengal Election: काही दिवसांपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी केला होता भाजपत प्रवेश
पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीदरम्यान अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपत प्रवेश केला होता. दरम्यान, या प्रवेशानंतरच काही दिवसांत त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं बुधवारी याला मंजुरी दिली. मिथुन चक्रवर्ती यांचा केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे सुरक्षा पुरवली जामार आहे.
काही दिवसांपूर्वीच मिथुन चक्रवर्ती यांनी पुन्हा राजकारणात येण्याचा निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपतील प्रवेशानंतर काही दिवसांतच त्यांना केंद्रानं Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भाजपतील प्रवेशानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधानांसोबत मंचावर उभं राहण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलं होतं. तसंच सभेदरम्यान ते आक्रमक भूमिकेतही दिसून आले होते.
मी कोब्रा.. दंश केल्यास फोटो लागेल
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कोलकातामध्ये त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. भाजपचं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर ते आक्रमक भूमिकेत दिसून आले. "मी एक नंबरचा कोब्रा आहे... एक दंश जरी झाला तरी तुम्ही फोटो बनून जाल," असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. ते कोलकाता येथे पार पडलेल्या ब्रिगेड ग्राऊंड येथील रॅलीत उपस्थित होते.
"मी बंगाली आहे त्याचा मला अभिमान आहे. मला माहितीये की तुम्हाला माझे डायलॉग्ज आवडतात," असंही मिथुन चक्रवर्ती यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटातील एका डायलॉगदेखील म्हटला. "हे सर्व पाहून आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानांसह मंचावर उभा राहणार आहे. हे खरंच स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे," असंते म्हणाले होते.