West Bengal Election : "पश्चिम बंगालच्या लोकांना उत्तम प्रशासन हवं; सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी, हिंसाचाराला लगाम घालणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 07:06 PM2021-04-23T19:06:20+5:302021-04-23T19:15:38+5:30
West Bengal Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीद्वारे साधला जनतेशी संवाद
सध्या देशात कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसंच उच्चस्तरीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला. दरम्यान, आपण त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही याबाबत त्यांनी लोकांसमोर खंत व्यक्त केली. "सकाळपासूनच मी अनेक बैठकांमध्ये व्यग्र होतो. कोरोनाच्या कारणामुळे मी तुमच्यापर्यंत थेट पोहोचू शकलो नाही याचं मला दु:ख आहे. परंतु या ठिकाणी फार कमी लोकं आहेत. सर्वांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. "भाजपचं डबल इंजिन सरकार बंगालच्या विकासात कोणतीही कसर राहू देणार नाही. बंगालच्या लोकांना उत्तम शासन हवं आहे. सत्तेत आल्यास घुसखोरी, तस्करी आणि हिंसाचारावर लगाम घातला जाईल. बंगालच्या लोकांना भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं जाईल," असं मोदी यावेळी म्हणाले.
"बंगालची जनता चांगल्या प्रशासनासाठी मतदान करत आहे. बंगालमधील जनता शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी आग्रही आहे," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता दक्षिण येथील आपल्या रॅली रद्द केल्या होत्या.
#WestBengalElections2021 are not just for a change in the govt, I can see the rise of an aspirational and optimistic West Bengal in these polls. Be it villages or cities, I can see yearning for a better life, better education, better employment and better option everywhere: PM pic.twitter.com/cJZsGw8x0c
— ANI (@ANI) April 23, 2021
WB is waiting for governance where every dept of the govt works honestly & carries out its duty. Free of discrimination & full of harmony - WB is voting for such a govt: PM addresses rallies in Suri, Malda, Berhampore, & Bhawanipur via video conferencing#WestBengalElections2021pic.twitter.com/deZUjutUdH
— ANI (@ANI) April 23, 2021
ममता बॅनर्जींनी साधला होता मोदींवर निशाणा
कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हे पंतप्रधान मोदीनिर्मित संकट असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रचारसभेदरम्यान त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. सात महिन्यांअगोदर केंद्राने म्हटले होते की, कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. एकीकडे देशात लसी, ऑक्सिजनची कमतरता आहे. दुसरीकडे लसी व औषधे बाहेरील देशांत पाठविली जात आहेत. निवडणुकीत भाजप दुसऱ्या राज्यांतून लोक बंगालमध्ये आणत आहे आणि त्यामुळे संसर्ग वेगाने पसरत आहे. म्हणून याला पंतप्रधाननिर्मित संकटच म्हणावे लागेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, डावे पक्ष व आयएसएफच्या आघाडीला मतं देणे म्हणजे भाजपला आणखी मजबूत करण्यासारखे आहे, असा दावादेखील त्यांनी केला होता.