West Bangal Elections 2021: पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. बंगालमध्ये ३० तर आसाममध्ये ३९ जागांसाठी मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी काही ठिकाणी ईव्हीएम मशील बिघाडाच्या घटना समोर आल्या. तृणमूल काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर मतदारांना धमकावल्याचे आरोप केले आहेत. त्यात पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदार संघात सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण या मतदार संघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात भाजपचे शुभेंदु अधिकारी यांनी आव्हान दिलं आहे. मतदानादरम्यान शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दोनच दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार अशोक डिंडाच्या गाडीवरही दगडफेक झाली होती. यात डिंडा याला दुखापत देखील झाली होती. आता मुख्यमंत्र्यांविरोधात उभं असलेल्या उमेदवाराच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची घटना झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये जंगराज सुरू असल्याचा आरोप शुभेंदु यांनी केला आहे.
शुभेंदु यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या काचा फुटल्याचं दिसून येत आहे. "पाकिस्तानी लोकच असं करू शकतात. जय बांगला हे घोषवाक्य बांगलादेशमधून आलेलं असून एका समूहाच्या जोरावर विजय मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे", असा आरोप शुभेंदु अधिकारी केला आहे.