नवी दिल्ली - सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. पश्चिम बंगालमध्ये आज आठव्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान झाले. यानंतर आता 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र या आधी एबीपी न्यूज सी व्होटरने एक्झिट पोल (West Bengal Exit Polls 2021) जाहीर केला आहे. एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) बंगाल राखणार की कमळ (BJP) फुलणार? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची हॅटट्रिक जवळपास निश्चित असून तृणमूल काँग्रेस (TMC) एकहाती सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत. एबीपी न्यूज सी वोटरने केलेल्या एक्झिट पोलनुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये 152 ते 164 जागा मिळतील असा अंदाज आहे. एक्झिट पोलनुसार निकाल लागल्यास ममता बॅनर्जी सहजपणे सरकार स्थापन करू शकतात. कारण राज्यातील कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी 148 जागांची आवश्यकता आहे.
एबीपी सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला बराच फायदा होताना दिसत आहे. भाजपाला 109 ते 121 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेस आणि डाव्यांच्या जागा 14 ते 25 दरम्यान असू शकतात.
West Bengal Exit Poll Results 2021
टीएमसी -152 ते 164 जागाभाजपा - 109 ते 121 जागाडावे-काँग्रेस आणि आयएसएफ - 14 ते 25इतर - 0
रिपब्लिक भारत एक्झिट पोल
रिपब्लिक भारतच्या एक्झिट पोलमध्ये तृणमूल काँग्रेसला 128-138 जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपाला 138 ते 148 जागा मिळू शकतात. तर डावे आणि काँग्रेसच्या आघाडीला 11-21 जागांवर समाधान मानावं लागेल. भाजपाने तृणमूल काँग्रेसला जोरदार टक्कर दिलेली पाहायला मिळत आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलने भाजपा 100 च्या वर जाईल असं म्हटलं आहे. तसेच काहींनी ते सत्तेच्या जवळ जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे.
2016 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
2016 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) 211 जागा जिंकल्या. भाजपाला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा आणि डाव्या पक्षांच्या 26 जागांवर समाधान मानावे लागले होते.