मुंबई : केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चेचा पहिले राऊंड, दुसरे राऊंड असे विक्रम करतेय. हा काही ऑलिम्पिक गेम सुरु आहे का? आशियाई गेम सुरु आहे का, खरेतर पहिल्याच दिवशी हा प्रश्न निकाली लागायला हवा होता. गेल्या ६० दिवसांपासून पंजाब. हरियाणाचा शेतकरी आंदोलन करत आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारताना संशयही व्यक्त केला आहे.
पहिल्या राऊंडमध्येच न्याय मिळायला हवा होता. मला असे वाटतेय की यामागे एक अदृष्य शक्ती आहे. जिला देशातील वातावरण बिघडवायचे आहे. तसेच आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला. भाजपाने तेव्हाच निर्णय घेतला असता तर त्याचा त्यांनाच फायदा झाला असता. परंतू प्रजासत्ताक दिनापर्यंत शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणे हे दुर्दैव आहे. केंद्र सरकारला पुढे ते करावेच लागणार आहे, असे राऊत म्हणाले.
जय श्रीरामवरून कोणाला आक्षेप असण्याचे कारण नाही. हा आस्थेचा विषय आहे. ममतांदेखील श्रीरामवर आस्था ठेवतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. जागतिक स्तरावरील जगातील शेतकऱ्यांच्या आंदोलनांपैकी अभूतपूर्व आंदोलन होत आहे. गेल्या 60 दिवसांपासून हे शेतकरी आंदोलन करत आहेत. राज्या राज्यांतूनही त्यांना पाठिंबा मिळत आहे. मुंबईतही शेतकरी जमा होत आहेत. मात्र, एक काळजी घ्यावी लागेल, कोरोना वाढण्याची शक्यता आहे. याची भीती मुख्यमंत्र्यांनाही वाटत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी लढत आहेत. मैलोनमेैल पायपीट करून ते दिल्लीत, मुंबईत पोहोचलेत. भाजपाचे लोक आतूनच गुदमरले आहेत. प्रमुख लोकांनाही वाटतेय की प्रश्न सुटावा, असे राऊत यांनी सांगितले.