राणेंच्या घरासमोर मार खाणाऱ्या 'त्या' कार्यकर्त्याला आदित्य ठाकरेंनी दिलं मोठं गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 02:43 PM2021-08-27T14:43:39+5:302021-08-27T14:47:33+5:30
Shivsena Yuvasena news: मोहसीन शेख हा युवासैनिक जुहू इथल्या नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनात अग्रेसर होता.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांन तीव्र निदर्शनं केलं होतं. त्यादरम्यान पोलिसांकडून युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला होता. या लाठीचार्जदरम्यान मोहसीन शेख नावाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी कपडे फाटेपर्यंत मारहालं होतं. पण, याच सामान्य कार्यकर्त्याला आदित्य ठाकरे यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा कारणाऱ्या आणि युवासेनेची ताकद दाखवून देणाऱ्या मोहसीन शेख याला आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला आधित्य ठाकरेंकडून युवासेनेच्या सहसचिवपदी नियुक्ती दिल्यानंतर मोहसीन यांची मीडियामध्ये चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आपल्या ट्विटरवरुन मोहसीन यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केलं आहे.
युवासेनेचा ढाण्या वाघ मोहसीन शेख ह्यांची युवासेना सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! pic.twitter.com/biKqdgfEn8
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 27, 2021
मोहसीन शेख हा युवासैनिक जुहू इथल्या नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनात अग्रेसर होता. यावेळी पोलिसांनी त्याला कपडे फाटेपर्यंत मारलं होतं. या मारहाणीत मोहसीन जखमी झाल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करावा लागलं. त्याला पोलीस मारहाण करतानाची क्लिप व्हायरल झाली. पण, आता मोहसीन याच्या कार्याची आणि त्याच्या पक्ष निष्ठतेची दखल थेट आदित्य ठाकरे यांनी घेतली आणि त्याला युवासेना सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्नी राष्ट्रवादीची नगरसेविका
मोहसीन शेख हा आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. चार वर्षांपूर्वी त्यानं शिवसेनेत प्रवेश केला होता. पण, त्याची पत्नी राष्ट्रवादीतच राहिली. आता मोहसीन शेख हा शिवसेनेत असला तरी त्याची पत्नी नादिया शेख ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. तसेच, ती शिवाजीनगर, मानखूर्द येथील राष्ट्रवादीची नगरसेविका आहे.