पुणे : पैसे असलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडची रोकड चोरुन नेण्याचे फंडे अवलंबले जातात़. आता त्यांनी एक नवाच फंडा काढला़ चक्क लिफ्ट देण्याचा बहाणा करुन एका जोडप्याचे तब्बल एक लाख रुपये चोरुन नेण्याचा प्रकार रविवारी घडला़.याप्रकरणी तुळशीराम वावळकर (वय ५९, रा़ कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तुळशीराम वावळकर हे आपल्या पत्नीसह कात्रज येथे जाण्याकरीता शिवाजीनगर येथील बँक आॅफ महाराष्ट्रसमोरील बसस्टॉपवर पहाटे साडेपाच वाजता उभे होते़. यावेळी पांढऱ्या रंगाची मोटार आली़ गाडीत बसलेल्याने कुठे जायचे आहे, असे विचारले़. तेव्हा त्यांनी कात्रज आंबेगाव येथे जायचे असल्याचे सांगितले़. तेव्हा गाडीत माणसाने प्रत्येकी वीस रुपये द्यावे लागतील, असे सांगितले़. त्यानुसार दोघेही जण गाडीत बसले़ तेव्हा मोटारचालकाने त्यांच्या हातातील काळ्या व लाल रंगाची बॅग पाठीमागे बसलेल्या माणसाकडे दिली़. त्या बॅगेत एक लाख रुपये होते़. काही अंतर गेल्यावर चालकाने गाडी थांबवली व मला फोन आला आहे़ मला परत जावे लागेल़, मी पुढे येणार नाही़ तुम्ही येथेच उतरा असे म्हणाला़. त्यानुसार दोघेही खाली उतरले़ मागे बसलेल्याने त्यांची बॅग गाडीच्या खिडकीतून खाली फेकली़ ती बॅग उचलेपर्यंत गाडी निघून गेली़. त्यांना संशय आल्याने त्यांनी बॅग उघडून पाहिली असता बॅगेत ठेवलेली १ लाख रुपयांची रक्कम दिसून आली नाही़. त्यांनी तातडीने शिवाजीनगर पोलिसांकडे धाव घेतली़. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ .अशाप्रकारे लिफ्टचा बहाणा करुन पैसे चोरण्याचा ही पहिलीच घटना आहे़. रविवारी इतक्या सकाळी ही घटना घडली असल्याने चोरट्यांनी पाळत ठेवून अथवा तक्रारदाराने बँकेतून पैसे काढल्यानंतर त्यांचा पाठलाग करुन हा गुन्हा केल्याचेही दिसत नसल्याने पोलीसही काहीसे चक्रावून गेले आहेत़.