पुणे : राज्य सरकारच्या प्लॅस्टिक बंदीनंतर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने गेल्या दोन आठवड्यात तब्बल १२ टन प्लॅस्टिक जप्त केले आहेत. राज्य सरकारनेच १ महिना सवलत दिली असून त्यानंतर म्हणजे २३ एप्रिलनंतर प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. विकणारे व वापरणारे अशा दोघांनाही यात दोषी धरण्यात येणार आहे. प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी स्वतंत्र पथकच स्थापन केले आहे. शहराच्या सर्व भागातून सध्या प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येत आहे. महापालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले की पुणे शहरात प्लॅस्टिक पिशव्या तयार करण्याचे प्रमाण कमी आहे. बहुतेक माल बाहेरून मागवण्यात येतो. तो मुख्य विक्रेत्यांकडून जप्त करण्यात येत आहे.किरकोळ विक्रेत्यांकडूनही प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा करण्यात येत आहेत. सरकारने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या आदेशात अद्याप काही गोष्टींबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे काही माल कंपनीमधूनच प्लॅस्टिक पिशवीत बंद होऊन येतो त्याचे काय करायचे याबद्धल अद्याप स्पष्ट आदेश नाहीत, कदाचित तो माल थेट कंपनीमधूनच २३ तारखेनंतर बंद होईल असे दिसते आहे. कंपनीवरच सरकारकडून कारवाई होण्याची शक्यता आहे असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. शहरातील कापड दुकानदार, मॉल्स यांच्याकडून ग्राहकांना सर्रासपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून माल दिला जातो. त्यासाठी पैसेही घेतले जातात. त्यांच्यावरही बंदी आहे, मात्र सध्या त्यांना व सर्वांनाच २३ एप्रिलपर्यंत त्यांच्याकडे असलेला साठा नष्ट करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र राज्यात सर्वत्र प्लॅस्टिकचा वापर पुर्णपणे बंद करावाच लागेल, कायदाच तसा झाल्याने त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन प्रयत्नशील असेल असे जगताप यांनी सांगितले.
महापालिकेकडून १२ टन प्लॅस्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 9:28 PM
राज्य सरकारनेच १ महिना सवलत दिली असून त्यानंतर म्हणजे २३ एप्रिलनंतर प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देविक्रेत्यांवर कारवाई: किरकोळ वापरदारांकडे दुर्लक्ष