पुणे, दि. 21 - यंदा पुण्याचे गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवामध्ये महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर अधिक भर देण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये शाडूच्या मूर्ती बनविण्याचा उपक्रम असो, की पर्यावरणपूरक मखरी बनविणे, ‘स्मार्ट सोसायटी गणेशोत्सव’ स्पर्धा, गणेश मंडळाचे देखावे स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाला स्वतंत्र सामाजिक परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला समाजप्रबोधनाची जोड दिली.
पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करतोय आणि त्या निमित्ताने पुणे महानगरपालिका हा गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेने आणि दिमाखात साजरा करत आहे. जगाच्या नकाशावर पुण्याच्या उल्लेखनीय ठसा उमटवण्यासाठी पुण्याच्या गणेशोत्सवाचाही या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या मुकुटात पुणे महानगर पालिका मानाचे दोन शिरपेच बसविणार आहे.
पुणे मनपाच्या या महत्वकांक्षी विश्व विक्रमी उपक्रमांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील 125 नामवंत कलाकारांच्या हस्ते गुरुवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची महाआरती आणि श्री अथर्वशीर्षाचे पठण होणार आहे. श्री गणेशाला भारतीय संस्कृतीत, 64 कलांचा अधिपती मानले जाते.विविध कलांच्या या दैवतेला ,विविध कलांचे उपासक पारंपरिक वेशात आपली सेवा श्री च्या चरणी रुजू करतील.पुणे शहरातील चित्रपट,नाट्य ,कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अभिनेते -अभिनेत्री ,गायक,वादक,नर्तक, रंगभूमीवरील रंगकर्मी,तंत्रज्ञ,निवेदक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संयोजक-आयोजक आणि व्यावसायिक श्री गजाननाला ,येणारा गणेशोत्सव शांततेत ,निर्विघ्नपणे ,एकोप्याने आणि सुरक्षितपणे पार पडावा म्हणून एकत्रितपणे साकडं घालतील . महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मान मिळवलेल्या पुण्यात हा सांस्कृतिक वारसा जपण्याचा या कलाकारांसह अनेक संस्था सुद्धा पुढे आल्या आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद -पुणे आणि कोथरूड शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद ,एकपात्री कलाकार पुणे, शाहीर परिषद,m.a.p पुणे, बालगंधर्व परिवार, लोककला -लावणी निर्माता व कलावंत संघ ,नाट्य निर्माता संघ,ऑर्केस्ट्रा निर्माता संघ,रंग भूमी सेवक संघ, नृत्य परिषद ,साउंड लाईट जनरेटर संस्था या संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद या महाआरती सहभागी होणार आहेत.
या सोहळ्यातील अनेक उपक्रमांपैकी दोन उपक्रमांची नोंद थेट 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये होणार आहे. त्यातील एक उपक्रम म्हणजे शाडू मातीचे पर्यावरणपूरक गणपती, शालेय विध्यार्थ्यांना कडून विक्रमी संख्येने एकाच वेळेस बनविले जातील आणि दुसरा उपक्रम म्हणजे पुण्यातील हजारो तरुण -तरुणी ढोल ताशा वादक शिस्तबद्ध रित्या एकत्रितपणे आपला वादनाविष्कार सादर करतील! या दोन विश्व विक्रमांमुळे पुणे आणि पुण्याच्या गणेशोत्सव जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा अधोरेखित होईल.