उंडवडी कडेपठार : बारामती तालुक्यातील निरावागज येथून टेम्पोत भरून उस्मानाबादला कत्तलीसाठी चालविलेली जनावरांची गोरक्षक व व्यसनमुक्तीचं कार्य करणाऱ्या युवकांनी सुटका केली. या युवकांनी या घटनेची माहिती पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना दिली. त्यांनी पोलिसांना संपर्क केल्याने टेम्पोसह ही जनावरे बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली.
याप्रकरणी टेम्पोचालक हाजी राजा शेख (रा. निरावागज) व टेम्पोमालक जाबीर कुरेशी (रा. म्हाडा कॉलनी, बारामती) या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यासंबंधी ऋषिकेश प्रभाकर देवकाते (रा. कौलारूवस्ती, निरावागज) यांनी फिर्याद दिली.
निरावागज भागातील जनावरांची खरेदी करून गावातील काही लोकं ती जनावरे सोलापूर, उस्मानाबाद भागात कत्तलीसाठी नेत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या होत्या. त्यामुळं निरावागज मधील काही युवक या बाबींवर लक्ष ठेवून होते. दि. १९ सप्टेंबर रोजी फिर्यादी सोनगाव येथे कामानिमित्त गेले असताना निरावागज येथील त्यांच्या मित्रानं एका टेम्पोतून १५ गायी नेल्या जात असल्याचं सांगितलं.
फिर्यादीने तात्काळ ही बाब शिवशंकर स्वामी यांना कळवली. स्वामी यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी टेम्पोचालकाकडे जनावरं खरेदी विक्रीसंबंधीच्या पावत्यांची तसेच वाहतूक परवान्याची विचारणा केली. पावत्या नसल्याचं त्यानं सांगितलं. सदरचा टेम्पो कुरेशी याच्या मालकीचा असल्याचं सांगण्यात आले. पोलिसांनी टेम्पोसह जनावरं ताब्यात घेतली असून दोघांवर गुन्हा दाखल केला. उंडवडी कडेपठार येथील गोशाळा येथे राञी १२ च्या सुमारास सुखरूप पोचवण्यात आले होते. बारामती तालुक्यातील निरावागज, सोनगाव, डोर्लेवाडी, मळद आदी भागातून जनावरं कत्तलीसाठी नेण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी संबंधितांचा बंदोबस्त करण्याची गरज शिवशंकर स्वामी यांनी व्यक्त केली.