पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 01:09 PM2020-12-30T13:09:48+5:302020-12-30T13:10:46+5:30
कोविड-19 च्या लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू
पुणे : जिल्ह्यात येणाऱ्या नवीन वर्षांत जिल्हा प्रशासनाला कोविड-19 चे लसीकरण हे मोठे आव्हान असून, शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात तब्बल 1 लाख 10 हजार 434 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी लस देणारे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती ‘कोविन’ या पोर्टलवर भरणे, लस साठवण क्षमता तयार करणे, यासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी देखील नुकताच प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. याबाबत डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात 253 शासकीय आरोग्य संस्था व खाजगी आरोग्य संस्था 8 हजार 89 अशा एकूण 3 हजार 842 खाजगी व शासकीय संस्थांची संख्या आहे. यात शासकीय आरोग्य कर्मचारी 24 हजार 739 तर खाजगी आरोग्य कर्मचारी 85 हजार 695 ऐवढे आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात प्रशासनाला 1 लक्ष 10 हजार 434 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस द्यावी लागणार आहे. या सर्व शासकीय व खाजगी संस्था तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती ‘कोविन’ या पोर्टलवर भरण्यात येत आहे. कोविड १९ लसीकरणाकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दल समिती स्थापन करण्यात आली असून, समितीच्या दोन बैठका देखील झाल्या आहेत. कोविड १९ च्या लसीकरण पूर्वतयारीबाबत या बैठकांमध्ये आढावा व चर्चा करण्यात आली. या मोहिमेत पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना (शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच खाजगी आरोग्य संस्था) यांना लसीकरण करण्यात येईल. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर संलग्न आजार असलेले रुग्ण व वयोवृद्ध यांचा समावेश करण्यात येईल व तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांचा समावेश करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कोविड १९ लसीकरणासाठी २ हजार ५४६ लस टोचक नेमण्यात येणार आहेत. लसीकरणामध्ये प्रत्येकी २ डोस २८ दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहे. लसीच्या साठवणीसाठी १८५ आय.एल.आर. व १५७ डीफ्रीजर आहेत. ‘कोविन’ या कोविड १९ करिता तयार करण्यात आलेल्या पोर्टलबाबत तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुकास्तरीय आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक आणि सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेण्यात आलेले आहे.