पुणे : आभासी चलनाच्या व्यवहारातून ६ जणांनी मॅकेनिकल इंजिनिअरला रोख ३ लाखांसह १५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला.
याप्रकरणी धीरज जगदाळे (वय ४८, रा. डीएसके विश्व, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १८ डिसेंबर २०१७ ते जुलै २०२१ दरम्यान घडली आहे. धीरज हे मॅकेनिकल इंजिनिअर असून सिव्हिल व्यवसायात कार्यरत आहेत़. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांची आनंद जुन्नरकर यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांनी व इतरांनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना मोनेश क्लासिक नावाचे आभासी चलन बनविल्याचे सांगितले. त्यात जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने ३ लाख रुपये रोख घेतले. तसेच बिटकॉईन वॉलेट आणि इथोरिअम अॅड्सवर वेळोवेळी रक्कम पाठविण्यास सांगून कोणत्याही प्रकारची रक्कम परत न करता १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करीत आहेत.