पुणे : बस पास दरवाढ तसेच पंचिंग पास बंदविरोधात पीएमपी प्रवासी मंचने विविध बसस्थानकांवर राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेत १५ हजार प्रवाशांनी सहभाग घेतला. या प्रवाशांच्या सह्यांचे निवेदन शनिवारी महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले.पीएमपीकडून १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पास मध्ये अनावश्यक बेकायदा दरवाढ करण्यात आल्याचा दावा पीएमपी प्रवासी मंचने केला आहे. ही दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मंचच्या वतीने विविध बसस्थानकावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मंचामधील कार्यकर्त्यांनी विविध स्थानकांवर जाऊन प्रवाशांशी चर्चा करून पास दरवाढीविरोधात त्यांचे सह्यांच्या रुपाने समर्थनही मिळविले आहे. या मोहिमेत १५ हजार प्रवाशांनी सहभाग घेतला आहे. या सह्यांचे निवेदन पीएमपी प्रवासी मंच आणि सहभागी संस्थांतर्फे मोहोळ यांना देण्यात आले. बसपास दरवाढ कमी करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडचे महापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांचे संचालक मंडळ एकमताने ठराव मांडणार असल्याचे आश्वासन मोहोळ यांनी या वेळी दिले.सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, सहसचिव सतीश चितळे, जयदीप साठे, नीलकंठ मांढरे, आशा शिंदे, नागरिक चेतना मंचाचे कर्नल बाबूराव चौधरी, जनवादी महिला संघटनेच्या सरस्वती भांदिरगे, आम आदमी पार्टीचे किशोर मुजुमदार, एस. एम. अली, लोकायतचे तुषार भोतमांगे आदी उपस्थित होते.- १ सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पासमध्ये अनावश्यक बेकायदा दरवाढ करण्यात आल्याचा पीएमपी प्रवासी मंचने केला दावा.
पास दरवाढीविरोधात १५००० सह्यांचे निवेदन; स्थायी समितीला प्रवाशांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 3:33 AM