पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये २० जण इच्छुक, नावे आली समोर
By राजू हिंगे | Published: January 9, 2024 08:33 PM2024-01-09T20:33:40+5:302024-01-09T20:35:31+5:30
आजी-माजी आमदार, माजी नगरसेवक, पक्षाचे माजी शहराध्यक्ष पदाधिकारीसह रेडीओ जॅाकीपर्यंत अनेकांंनी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत....
पुणे : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येउन ठेपल्या आहेत. त्यामुळे इच्छुक आतापासून सरसावले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काॅंग्रेसकडे २० इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यात आजी-माजी आमदार, माजी नगरसेवक, पक्षाचे माजी शहराध्यक्ष पदाधिकारीसह रेडीओ जॅाकीपर्यंत अनेकांंनी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत.
शहर काँग्रेसकडून ७ ते ९ जानेवारी या कालावधीत पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यात शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, अॅड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, संगीता तिवारी, माजी नगरसेवक आबा बागूल, विरेंद्र किराड, दत्ता बहिरट, नरेंद्र व्यवहारे, यशराज पारखी, मुकेश धिवार, राजू कांबळे, मनोज पवार, दिग्विजय जेधे आणि आर. जे संग्राम खोपडे या २० जणांनी अर्ज सादर केले आहेत.
ही यादी प्रदेश कार्यकारीणीस पाठविली जाणार आहे. त्यानंतर ही यादी केंद्रीय कार्यकारिणीस पाठविली जाणार आहे. मात्र, पक्षाकडून या नावांमधील एकाला संधी दिली जाणार की आयत्या वेळी वेगळयाच नावाला पसंती दिली जाणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.