आता बोला! स्पीड पोस्टद्वारे मागितली २० लाखांची खंडणी; पुण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 09:41 PM2021-06-03T21:41:22+5:302021-06-03T21:42:17+5:30
बँक मॅनेजरविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दिली धमकी...
पुणे : स्पीड पोस्टद्वारे पत्र पाठवून ४२ वर्षाच्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन ऑनलाईन २० लाख रुपये खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच स्वारगेट परिसरातील एका बँक मॅनेजरच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी मार्केटयार्ड परिसरातील एका ४२ वर्षाच्या व्यक्तीने मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी स्वारगेट परिसरातील एका बँक मॅनेजरच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. चौकशी अंती काही तथ्य न आढळल्याने तो अर्ज फाईल करण्यात आला. दरम्यान, फिर्यादी यांना १३ मे रोजी एक निनावी पत्र आले. त्यामध्ये संबंधित बँक मॅनेजरच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घे, तसेच माझ्या बँक खात्यावर ऑनलाईन २० लाख रुपये जमा कर, नाही तर तुला व तुझ्या परिवाराला जीवे ठार मारुन टाकील, अशी धमकी दिली आहे. फिर्यादीने न्यायालयात धाव घेऊन खासगी तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.