आंबील ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी; नाल्यांचा प्रश्न सुटणार
By राजू हिंगे | Published: February 28, 2024 06:54 PM2024-02-28T18:54:44+5:302024-02-28T18:59:29+5:30
२०१९ साली आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली, त्यात वित्त आणि मनुष्यहानी झाली होती
पुणे : आंबील ओढा येथे खाजगी जागा मालकीमध्ये सीमा भिंती बांधणे यासाठी महापालिकेचा निधी तांत्रिक अडचणींमुळे खर्च करता येत नव्हता. त्यामुळे सीमा भिंतींची कामे रखडली होती.त्यासाठी राज्य सरकारच्या विशेष निधीची आवश्यकता होती. त्यानुसार या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे.
राज्यसरकारचा या कामासाठी विशेष निधी मिळावा, यासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर तातडीने निर्णय घेत हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय संदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
‘महापालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या अंतर्गत २०० कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत. उपलब्ध झालेल्या निधीमुळे शहरातील नाल्यांच्या कडेने संरक्षण/सीमा भिंती बांधल्या जाणार असून विशेषतः आंबील ओढा परिसराला याचा मोठा फायदा होणार आहे. या सीमा भिंतींमुळे पूरपरिस्थितीत पाणी प्रवाही राहण्यास मदत होणार आहे. ‘कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने २०१९ साली आंबिल ओढा परिसरात दुदैवी घटना घडली, त्यात वित्त आणि मनुष्यहानी झाली. असा प्रकार टाळण्यासाठी सीमा भिंतींची कामे महत्त्वाची ठरणार होती. त्यासाठी आपल्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाला, याचे नक्कीच समाधान आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे शहराकडे विशेष लक्ष असल्याचे या निधीच्या मंजुरीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आभारी आहे, असेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.