पुणे : कृषिपंपाच्या वीज बिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील १२ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील २६४४ कोटी ७७ लाख रुपये माफ केले आहेत, तर या शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल ४ हजार ३ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे. आर्थिक संकट गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीज बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
कृषिपंप वीजजोडणी धोरणातून कृषिपंप वीज बिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील १२ लाख ५० हजार ६८५ शेतकऱ्यांकडे १० हजार ८४१ कोटींची मूळ थकबाकी होती. त्यातील २६४४ कोटी ७७ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखनद्वारे सूट, तसेच विलंब आकार व व्याजातील सूटद्वारे माफ केले आहे.
या योजनेचा लाभ घेत पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८० हजार ५२२ शेतकरी वीज बिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. पुणे परिमंडलातील १३ हजार ७५४ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.