सीमेवरील सैनिकांकरिता २५ हजार राख्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 06:50 PM2018-08-18T18:50:43+5:302018-08-18T18:51:14+5:30

समाजाच्या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करुन देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, याकरीता १९९८ पासून हा सातत्याने राबविण्यात येत आहे.

25 thousand raakhies For soldiers on the border | सीमेवरील सैनिकांकरिता २५ हजार राख्या रवाना

सीमेवरील सैनिकांकरिता २५ हजार राख्या रवाना

Next
ठळक मुद्देकच्छ, सियाचीन, आसाम,काश्मीर, राजस्थान, पंजाब, बंगाल आदी १५० सीमाभागांत प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या

पुणे : भारतीयांच्या रक्षणासाठी सैनिक देशाच्या सीमेवर लढत असतात. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी हे सैनिक आपल्या कुटुंबाला विसरून आपले देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडत असतात. अनेक सण-समारंभ देखील ते आपल्या कुटुंबियांसमवेत साजरे करु शकत नाहीत. सण-समारंभाच्यावेळी आपल्या परिवाराबरोबर आपण सण साजरा करतो आहे, असे त्यांना वाटावे. यासाठी आपल्याबरोबरच आपल्या देशाचे सदैव रक्षण करणा-या सरहदवर लढणा-या सैनिकांना आपला भाऊ मानणा-या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी पंचवीस हजारांहून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यास पुढाकार घेतला. भारत माता की जय... च्या जयघोषात विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या एकत्रित राख्यांचे उत्साहात पूजन करण्यात आले. 
   सैनिक मित्र परिवार आणि  त्वष्टा कासार समाज गणेशोत्सव मंडळतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाचे महाकालिका मंदिर येथे ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे आणि पारंपारिक वेशात आलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेश पोटफोडे, महराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. बिपीन पाटोळे, सैनिक मित्र परिवाराचे अशोक मेहंदळे, आनंद सराफ, निता करडे, वीरमाता सुवर्णा गोडबोले, वीरपत्नी दिपाली मोरे, सुनीता गायकवाड, स्वरुपवर्धिनीच्या पुष्पा नढे उपस्थित होते. तसेच यावेळी अनुराधा मराठे यांनी सैनिक हो तुमच्यासाठी... गीताच्या सादरीकरणातून सैनिकांप्रती असलेला आदर व्यक्त केला. तसेच मनिषा निजामपूरकर यांनी गायलेल्या ए मेरे वतन के लोगो या गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले. कल्याणी सराफ, गिरीजा पोटफोडे, रुपाली मावळे, राजू पाटसकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. 
  अनुराधा मराठे म्हणाल्या, आज माझ्या आयुष्यातील अतिशय संस्मरणीय प्रसंग आहे. सातत्याने सैनिकांसाठी असे उपक्रम करीत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते या लोकांना देशाबद्दल प्रचंड प्रेम असते हे मी अनुभवले आहे. सैनिक आपल्या घरादारापासून दूर, एकटे सीमेवर लढत असतात. आपल काहीतरी सीमेवर पोहोचते तेव्हा या साधनांच्या माध्यमातून आपली सैनिकांशी एकप्रकारे भेट होत असते. अशा माध्यमातून त्यांना मिळालेली भेट ही सहदय असते. 
    आनंद सराफ म्हणाले, समाजाच्या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करुन देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, याकरीता १९९८ पासून हा सातत्याने राबविण्यात येत आहे. यामधून सैनिकांना आनंद व उर्जा मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. देशाच्या कच्छ, सियाचीन, आसाम,काश्मीर, राजस्थान, पंजाब, बंगाल आदी १५० सीमाभागांत प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या पाठविल्यानंतर तेथे पूजन करुन सैनिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अनेकदा सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून पत्र आणि भेटवस्तूदेखील पुणेकरांना पाठविल्या जातात. राखी संकलन व टपाल खर्चाकरीता ग्राहक पेठेचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले आहे. योगिनी समेळ - हजारे यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: 25 thousand raakhies For soldiers on the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.