महंमदवाडी तोडफोड प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचे ३ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:22+5:302021-02-15T04:11:22+5:30

पुणे : वानवडी पोलिसांनी सनी हिवाळे टोळीविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई केल्याने त्याच्या समर्थकांनी महंमदवाडी येथील तरवडे वस्तीत वाहनांनी तोडफोड केली ...

3 attempted murder cases registered in Mahammadwadi vandalism case | महंमदवाडी तोडफोड प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचे ३ गुन्हे दाखल

महंमदवाडी तोडफोड प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचे ३ गुन्हे दाखल

Next

पुणे : वानवडी पोलिसांनी सनी हिवाळे टोळीविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई केल्याने त्याच्या समर्थकांनी महंमदवाडी येथील तरवडे वस्तीत वाहनांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी हडपसरमध्ये एक व वानवडी पोलीस ठाण्यात दोन खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

अस्लम पोपट शेख (वय २३, रा. आदर्शनगर, देवाची उरुळी), स्वप्निल ऊर्फ ऋषभ महेंद्र हिवाळे (वय २४, रा. काळेपडळ, हडपसर), मगदुम फरदीन पटेल (वय २७, रा. देवाची उरुळी), शुभम हरिवंश तिवारी (वय १९, रा. ससाणेनगर, हडपसर), अनिकेत राजू वायदंडे (वय २२, रा. काळेपडळ, हडपसर), ओंकार गोरख (वय २२, रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सनी हिवाळे व त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. त्याच्या रागातून १५ ते २० जणांच्या जमावाने बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या जीपसह ४ रिक्षा, २ दुचाकी, २ टमटम या वाहनांवर कोयत्याने मारून त्यांच्या काचा फोडून वाहनांचे नुकसान केले होते.

याप्रकरणी संतोष लोंढे (वय ३८, रा. तरवडेवस्ती, साठेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. तसेच दुस-या घटनेत हरी घडाई (वय ५०, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. अस्लम शेख व त्याचे साथीदारांना शेख यांनी त्यांची मोटारसायकल काढायला सांगितले. यावरून त्यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच त्यांच्या टमटमची काेयत्याने काच फोडली. शेख व त्याच्या साथीदारांनी परिसरात आरडाओरडा करून दहशत निर्माण केली.

तिसरी फिर्याद राहुल घडई (वय २३, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी दिली आहे. राहुल घडई व त्यांचे वडिलांसोबत गाडी पार्क करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग धरून शेख व त्याच्या साथीदारांनी राहुल यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून लाकडी दांडक्याने मारहाण करीत जबर जखमी केले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना त्यांना जिवंत पाहुन पुन्हा त्यांच्या तोंडावर दगड मारून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: 3 attempted murder cases registered in Mahammadwadi vandalism case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.