पुणे : एके काळी गारेगार वाटणारे पुणे आता चांगलेच तापू लागले आहे. हवामान बदलाचा हा फटका असून, पुणे जिल्ह्यात उष्माघाताच्या तीन रुग्णांची नाेंद झाली आहे. त्यामुळे पुण्याचीही वाटचाल उष्ण शहरांच्या दिशेने हाेत आहेत. राज्यात या वर्षी उष्माघाताचे ४१ रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात १ मार्चपासून उष्माघाताची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची नोंद केली जात आहे. १ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान राज्यात उष्माघाताचे ४१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक ५ रुग्ण बुलढाणा येथील असून त्या पाठोपाठ अमरावती आणि कोल्हापूर येथे प्रत्येकी चार रुग्णांची नाेंद झाली. नाशिक, पुणे आणि ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत प्रत्येकी तीन रुग्णांची नाेंद झाली आहे, असे आराेग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले येते.
गतवर्षी उष्माघाताचे २२ बळी :
गेल्या वर्षी १ मार्च ते ३१ जुलैच्या दरम्यान, राज्यात उष्माघाताच्या ३ हजार १९१ संशयित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी २२ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वाधिक मृत्यूत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघरमध्ये उपस्थित असलेल्यांचे झाले. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. रुग्णालयांत येणारे बहुतेक रुग्ण हे ३०-४५ वयोगटांतील आहेत. कामासाठी उन्हातून दुचाकी वाहनांवर प्रवास करणे, डोके-चेहरा झाकण्यासाठी स्कार्फ, टोपी न वापरणे आणि कोल्ड्रिंकसारखी पेये टाळावी, असे अवाहन करण्यात आले आहे. उन्हात सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहनही आराेग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.