पुणे-काही दिवसापूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा पळून जाण्याच्या घटनेला १२ दिवस झाले. या प्रकरणात आरोपी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना पुणेपोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली. आता या प्रकरणी अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत. आता या प्रकरणी पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. बलकवडे याच्या घरात धाड टाकली, यात पोलिसांनी ३ किलो सोनं जप्त केले आहे.
ललित पाटीलचा भाऊ भूषणला वाराणसीतून अटक; पुण्यातील ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरण
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिषेक बलकवडे याच्या घरातून ३ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. बलकवडे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अभिषेक बलकवडे आणि ललित पाटील अनेकवेळा भेटत होते. भेटीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत, बलकवडे याने मेफेड्रॉनच्या विक्रीतून सोनं विकत घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अभिषेक पाटील हा स्वत: केमिकल इंजिनिअर आहे. भूषण पाटील आणि ललित पाटील यांच्यासोबत तो एका एमआयडीसीत मॅफेड्रॉन तयार करत होते. याच मॅफेड्रॉन मधून त्यांनी अमाप पैसा मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. त्यानंतर पुणे पोलिसांची १० पथके त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आली होती. ३० सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विभागाने ससून रुग्णालयाबाहेर २ कोटींपेक्षा अधिक रकमेचे एमडी (मॅफेड्रॉन) पकडल्यानंतर यातील मुख्य आरोपी ललित आणि त्याचा भाऊ भूषण असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.