पुणे : विमान प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने पुण्यातून देशभरात विविध ठिकाणी जाण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याची मागणीही वाढू लागली आहे. त्यामुळे लोहगावविमानतळ प्रशासनाने ३० नवीन विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत पुणे शहर आणखी काही शहरांना विमानसेवेद्वारे थेट जोडले जाणार आहे.मागील तीन-चार वर्षांमध्ये पुणे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढली आहे. हा आकडा सुमारे ८५ लाखांच्या पुढे गेला आहे. पुढील वर्षभरात सुमारे १ कोटींच्या पुढे ही संख्या जाईल असा विमानतळ प्रशासनाचा अंदाज आहे. सध्या विमानतळावरून दररोज सुमारे २०० विमानांचे उड्डाण होते. मागील वर्षभरात त्यामध्ये सुमारे ४० विमानसेवांची भर पडली आहे. आयटी हब असलेल्या पुणे शहरामध्ये देशातील विविध शहरांमधून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी नोकरदार, व्यावसायिक, उद्योजकांकडून विमानसेवेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विविध शहरांसाठी ही सेवा सुरू करण्याची मागणी असते. यापार्श्वभुमीवर विमानतळ प्रशासनाने ३० विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. याला विमानतळ संचालक अजय कुमार यांनीही दुजोरा दिला. २८ आॅक्टोबरपासून नवीन सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नाही. त्यानंतर याबाबतची सविस्तर माहिती दिली जाईल, असे अजय कुमार यांनी सांगितले. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ आॅगस्टपासून पुण्यातून रायपुर आणि हैद्राबादसाठी तर सप्टेंबरमध्ये गोव्यासाठी नवीन विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. जेट एअरवेज कंपनीकडून रायपुरसाठी आठवड्यातून दोनदा विमानसेवा पुरविली जाईल. तर स्पाईसजेटचे विमान दररोज हैद्राबादसाठी उड्डाण करेल. त्यानंतर २८ आॅक्टोबरपासून पुढील सहा-सात महिन्यात अन्य ठिकाणी सेवा सुरू केल्या जातील.
लोहगाव येथून लवकरच ३० नवीन विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 6:39 PM
मागील तीन-चार वर्षांमध्ये पुणे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढली आहे. हा आकडा सुमारे ८५ लाखांच्या पुढे गेला आहे.
ठळक मुद्देसध्या विमानतळावरून दररोज सुमारे २०० विमानांचे उड्डाण२८ आॅक्टोबरपासून पुढील सहा-सात महिन्यात अन्य ठिकाणी सेवा सुरू केल्या जाणार