पुणे : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) च्या समर्थनार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविप) तिरंगा रॅली काढण्यात आली. गणेश खिंड येथील माॅर्डन महाविद्यालयापासून शिवाजीनगर येथील माॅर्डन महाविद्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. 300 फुटी तिरंग्यासाेबत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत महाविद्यालयीन तरुण तरुणी सहभागी झाले हाेते.
देशभरात सीएए आणि एनआरसी या कायद्यांना विराेध हाेत असताना आता अभाविपकडून सीएएच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. तिरंग्याबराेबरच भारत मातेचा फाेटाे हातात धरण्यात आला हाेता. 'देश की जरुरत सीएए', 'युवा मांगे सीएए', 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. गणेश खिंडकडून सेनापती बापट मार्ग रस्त्याने फर्ग्युसन महाविद्यालयाकडून ही रॅली शिवाजीनगर येथील माॅर्डन महाविद्यालयाकडे गेली. माॅर्डन महाविद्यालयात या रॅलीचे सभेच रुपांतर झाले.
या रॅली विषयी बाेलताना अभाविपचे पुणे महानगरमंत्री अनिल ठाेंबरे म्हणाले, अभाविपकडून ही तिरंगा पदयात्रा काढण्यात आली आहे. अनेक महाविद्यलयातील विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. सर्वसामान्य विद्यार्थी सीएएच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे. देशाला ताेडण्याची गाेष्ट काही जणांकडून केली जात आहे. यालाच उत्तर देण्यासाठी आम्ही या तिरंगा रॅलीचे आयाेजन केले आहे.