पुणे : एसटी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसची संख्या वाढत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कडून चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. पुण्यात राज्यातून येणाऱ्या बसची संख्या लक्षात घेऊन स्वारगेट आगारात १५, तर दापोडी वर्कशाॅपमध्ये २० चार्जिंग पाॅइंट बसविण्यात येणार आहेत. यामुळे शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातील १२२, बाहेरील २८०, तर विभागीय कार्यालयात ७८ असे एकूण ५०० इलेक्ट्रिक बसचे एका दिवसात चार्जिंग होणार असून, ई-शिवनेरी, शिवाई बसची चिंता मिटणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात डिझेलवरील गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या वाढविण्यात येत आहेत. त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे आवश्यक आहे. त्याशिवाय या गाड्या धावू शकत नाहीत. तसेच राज्यातून सर्व विभागांतून पुण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. याचा विचार करून एकाच ठिकाणी जास्तीत जास्त गाड्यांचे चार्जिंग व्हावे, या उद्देशाने स्वारगेट आगारात वर्कशाॅपशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत १५ आणि दापोडी वर्कशाॅपमध्ये २० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसभरात ५०० बसच्या चार्जिंगची सुविधा होणार आहे. एसटीच्या इंधनावर होणारा खर्च वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला २१५ ई-बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे पुणे विभागात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्यात येणार आहे.
उच्च दाबाची वीजजोडणी
‘एसटी’कडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसला चार्जिंग करण्यासाठी आगारात उच्च दाबाची वीजजोडणी लागणार आहे. त्यामुळे महामंडळाकडून राज्यभरातील सगळ्या विभाग नियंत्रकांना असे केंद्र उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले असून, त्यात उच्च दाबाच्या वीज जोडणी देण्याचे आदेश दिले आहेत.
महामार्गावर चार्जिंग पॉइंट
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कडून सध्या डिझेलवरील लालपरीऐवजी भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या हळूहळू वाढणार आहे. दरम्यान, लालपरी या जिल्ह्याच्या ठिकाणातून कमी करून तालुका पातळीवर त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गावरदेखील महामंडळाकडून चार्जिंग पाॅइंट उभारण्यात येणार आहे.
स्वारगेट आगारात १५ आणि दापोडी वर्कशाॅपमध्ये २० चार्जिंग पाॅइंट बसविण्यात येणार आहेत. त्याचे काम सुरू झाले असून लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन आहे. - प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक