पुणे : गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ३६ हजार ८७५ पानांचे दोषारोपपत्र गुरुवारी दुपारी न्यायालयात सादर केले.यामध्ये डी एस के यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी मिळून २ हजार ४३ कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
बुधवारी डी एस के यांच्या नातेवाईकांसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी त्यात अजून भर पडली असून आज डी एस के यांच्या फायनान्स विभागाचे प्रमुख विनयकुमार बडगंडी यांना अटक करण्यात आली. याचबरोबर डी एस के यांनी कोणतीही मालमत्ता विकण्यास परवानगी यापूर्वीच नाकारण्यात आलेली आहे. बुधवारी अटक केलेले डी़ एस़ कुलकर्णी यांचे जावई केदार वांजपे हे पूर्वी त्यांच्याकडे कामाला होते़ त्यांना त्यांच्या व्यवहाराच्या अनेक बाबी माहिती आहेत़ त्यांची पत्नी सई वांजपे हिच्या नावावर डी़ एस़ के यांनी अनेक जमिनी खरेदी केल्या होत्या़ त्यांना यातील अनेक व्यवहारांची माहिती आहे़ तसेच डी़ एस़ कुलकर्णी यांच्या कंपनीतील २००७ -०८ पासून जमिनीचे सर्व प्रमुख व्यवहार धनंजय पाचपोर हे पहात होते़ त्यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये पाचपोर यांचा महत्वाचा वाटा आहे़ त्यांच्या उद्योगव्यवसायामधील प्रमुख ब्रेन पाचपोर यांचा असल्याचे सांगितले जाते़ .
गेले काही दिवस आर्थिक गुन्हे शाखेकडून डी एस के यांच्यावरील आरोपपत्राची तयारी सुरु होती. अखेर पूर्ण छाननी केल्यावर आज त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिसांनी ४ गाड्यांमध्ये मिळून हे जम्बो दोषारोपपत्र न्यायालयात आणले. अपर सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.