पुणे : बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी विशेष न्यायालयात ३७ हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले़. हा सूनियोजित कट असून त्याचा तपास खूप किचकट असून आतापर्यंतच्या तपासात एकूण २ हजार ४३ कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे़. अधिक तपास सुरु असून त्यातून डीएसके व त्यांच्या कुटुंबियांनी हा पैसा नेमका कोठे वळविला, हे स्पष्ट होऊ शकणार आहे़ अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे आणि विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली़. प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासात एकूण १३ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे़ अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. त्याबाबत केंद्रीय सक्त वसुली संचालनालयात वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे़, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
आरोपपत्रातील काही ठळक मुद्दे
- पहिल्या दोषारोपपत्रात २ हजार ४३ कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा कागदोपत्री पुरावा निष्पन्न.
- गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याने फॉरेन्सिक आॅडिटद्वारे हा पैसा कोठे कोठे फिरविला गेला, याची माहिती घेणे सुरु
- सहा राष्ट्रीयकृत बँकांकडून ड्रिम्स सिटीसाठी ४७७़७६ कोटी रुपये कर्ज घेतले़. त्यापैकी केवळ १५० ते १७५ कोटी रुपये त्या प्रकल्पावर खर्च झाले़ बाकीच्या पैशांचा अपहार झाला़.
- लोकांकडून पैशांची मागणी वाढल्यानंतर त्यांनी बँकांकडे गहाण असलेल्या जमिनींचे बेकायदेशीरपणे प्लॉट पाडून त्याचे नकाशे तयार केले़. पैशांऐवजी तुम्हाला प्लॉट देतो, असे सांगून बनावट प्लॉट दिले़.
ही आहे गैरव्यवहाराची आकडेवारी
- उघड झालेला आतापर्यंतचा गैरव्यवहार २०४३़१८ कोटी
- एकूण ठेवी ३३ हजाराहून अधिक
- ठेवीदार ६ हजार ७९२ जणांच्या तक्रारी
- ठेवी व कर्ज १०८७़७ कोटी
- वित्तीय संस्था/ बँकाकडून कर्ज ७११़३६ कोटी
- कर्जरोखे १११़ ३५ कोटी
- फुरसुंगी येथील जमिनीच्या व्यवहारातून अपहार १३ ६़७७ कोटी