ग्रामीण पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ३९ वाँटेड गुन्हेगारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:24 AM2021-01-13T04:24:42+5:302021-01-13T04:24:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलीस दलाप्रमाणेच ग्रामीण पोलिसांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी काॅम्बिंग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर पोलीस दलाप्रमाणेच ग्रामीण पोलिसांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी काॅम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यात रेकॉर्डवरील विविध गुन्ह्यांत वाँटेड असलेले ३५२ आरोपी चेक केले. त्यात ३९ आरोपी मिळाले असून त्यांना अटक केली आहे. या ऑपरेशनदरम्यान ११ आरोपींकडून ४ पिस्तुले, ६ काडतुसे, ६ तलवारी, कोयते जप्त केले आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी मध्यरात्री उपविभागनिहाय कोम्बिंग ऑपरेशन राबविले. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ७ उपविभागातून एकूण ७९ पथके तयार केली. त्यामध्ये ७२ पोलीस अधिकारी व ३७७ पोलीस अंमलदार सहभागी होते.
यादरम्यान, रेकॉर्डवरील शस्त्र बाळगणारे १५८ गुन्हेगार चेक करण्यात आले. त्यात सोमनाथ बाळासाहेब कांचन (वय ३४, रा. उरळी कांचन) याच्या ताब्यातून १ पिस्तूल व १ काडतूस जप्त केले. आदर्श सांगळे (वय २८, रा. मंगळवार पेठ, भोर) याच्याकडून १ पिस्तुल व २ काडतुसे, हर्षल काळे (वय २१, रा. शिरुर) यांच्या ताब्यातून २ तलवारी, रोहित आंद्रे (वय २०, रा. कुसगाव, ता. मावळ) याच्या ताब्यातून एक पिस्तुल व दोन काडतुसे, रुपेश लालगुडे, प्रतीक निळकंट यांच्या ताब्यातून १ पिस्तूल व २ काडतुसे व स्कूटर जप्त केले आहेत.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील ३५२ वाँटेड गुन्हेगार चेक केले. त्यातील ३९ जण मिळून आले असून त्यांना अटक करण्यात आली. हिस्ट्रीिशटर ५२ तसेच मालमत्तेच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील ९८ सराईत आरोपी चेक केले. यादरम्यान ३ तडीपार पुन्हा जिल्ह्यात मिळून आले. त्यांना अटक केली. निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ चालू असलेल्या ३८ हॉटेल्सवर कारवाई केली. बेकायदेशीरपणे दारुविक्री करणाऱ्यावर रांजणगाव पोलीस ठाण्याने २१ हजार रुपयांचा माल जप्त केला. या कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान लहान मोठी वाहने, हॉटेल, ढाबे, लॉजेस, एटीएम, पेट्रोल पंर, गुन्हेगारांची आश्रयस्थाने चेक केली. तसेच यापुढेही अशा प्रकारची मोहीम राबविणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.