खेड शिवापूर परिसरात ४ कोटींच्या वीजयंत्रणेची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:05+5:302021-07-16T04:09:05+5:30
मुळशी विभाग अंतर्गत वेळू व खेड शिवापूर परिसरातील औद्योगिक ग्राहकांना खेड शिवापूर ३३/२२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. मात्र ...
मुळशी विभाग अंतर्गत वेळू व खेड शिवापूर परिसरातील औद्योगिक ग्राहकांना खेड शिवापूर ३३/२२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. मात्र ज्या उच्चदाब वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. ती सुमारे २० वर्ष जुनी व अतिभारित आहे. तसेच दऱ्याडोंगरातून व जंगलातून ही वाहिनी जात असल्याने वादळवारा व पावसामुळे या वाहिनीमध्ये बिघाड निर्माण होतो. यावर उपाय म्हणून महावितरणने महानगर क्षेत्र पायाभूत वीजयंत्रणा सक्षमीकरण योजनेतून प्रामुख्याने खेड शिवापूर व वेळू येथील औद्योगिक ग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र ३३ केव्ही क्षमतेची नवीन डबल सर्किट वीजवाहिनी उभारण्याचे काम सुरू केले आहे.
या वीज वाहिनीचा काही भाग राष्ट्रीय महामार्गाच्या डक्टमधून नेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे.
यासोबतच खेड शिवापूर उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला आहे. या उपकेंद्राच्या वीजपुरवठ्यासाठी १३२ केव्ही कामथडी उपकेंद्रातील करंट ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात आली आहे. जीर्ण तारा बदलण्यासोबतच लघु व उच्चदाब वाहिन्यांसह वीजयंत्रणेच्या देखभालीचे कामे नियमितपणे सुरू आहेत. यामुळे सद्यस्थितीत पूर्वीच्या तुलनेत वीजपुरवठा अधिक सुरळीत झाला आहे. तसेच उभारण्यात येणारी डबल सर्किट वीजवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर या परिसरातील वीजपुरवठ्याचे सर्व प्रश्न संपुष्टात येणार आहेत.
चौकट
स्थानिकांच्या विरोधामुळे विलंब
गेल्या १८ महिन्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन तसेच कोविड रुग्णालये व ऑक्सिजन प्रकल्प यामुळे वीजपुरवठा बंद ठेवून जुनाट उच्चदाब वीजवाहिनीच्या देखभाल व दुरुस्ती कामांना मर्यादा आल्या होत्या. ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ या भयंकर चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर देखील महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. सध्या नवीन डबल सर्किट वीजवाहिनीचे काम वेगात सुरू असले तरी त्यासाठी खांब बसविण्यासाठी काही ठिकाणी स्थानिकांचा विरोध होत असल्यामुळे विलंब होत आहे. त्यावर तोडगा काढत कामे मार्गी लावण्यात येत आहेत.