चुलत भावाचा फोटो ‘डीपी’ला ठेवत व्यावसायिकाला ४ लाखांचा गंडा ; सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा नवा फंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 03:20 PM2021-09-02T15:20:45+5:302021-09-02T15:26:29+5:30
डीपीवर नातेवाईकाचा फोटो ठेवून फसवणूक करण्याचा हा पुण्यातील पहिलाच गुन्हा
पुणे : वेगवेगळ्या युक्त्या काढून लोकांना फसविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसतात. सायबर चोरट्यांचा एक नवा फंडा समोर आला आहे. व्हॉट्सॲपवरील डीपीवर परदेशातील चुलत भावाचा फोटो ठेवून त्याद्वारे कॉल करून भारतातील मित्राला पैशाची गरज असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला तब्ब्ल ४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे डीपीवर नातेवाईकाचा फोटो ठेवून फसवणूक करण्याचा हा पुण्यातील पहिलाच गुन्हा आहे.
याप्रकरणी पुणे विद्यापीठाजवळील आयसीएस कॉलनीत राहणाऱ्या एका ५३ वर्षांच्या व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बँक खातेदार, तसेच व्हॉट्सॲप वापरकर्त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचा चुलत भाऊ अमेरिकेत राहतो. १२ जुलै रोजी त्यांना एक व्हॉट्सॲप कॉल आला. त्यावर त्यांचा चुलत भावाचा फोटो लावला होता. त्यामुळे आपल्या चुलत भावाचा कॉल असल्याचा त्याचा समज झाला. पण, कॉलवर आवाज व्यवस्थित येत नव्हता. त्याने आवाजात खर खर असल्याचे सांगून भारतातील मित्राला मदतीची गरज असल्याचे सांगितले. मात्र, खर खर येत असल्याने त्यांना आपल्या चुलत भावाचा आवाज ओळखता आला नाही. त्यानंतर त्या नंबरवरून सायबर चोरट्याने त्यांच्या भावाच्या नावाने चॅटिंग सुरू केले. आपल्या भारतातील मित्राला वैद्यकीय कारणासाठी पैशाची गरज असल्याचे मेसेज करून सांगितले व त्यांना बँक खाते क्रमांक कळवून पैसे पाठविण्यास सांगितले. आपला चुलत भाऊच सांगत असल्याचे वाटून त्यांनी दिलेल्या नंबरवर ४ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र, हे करण्यापूर्वी आपण कोणाला कोठे पैसे पाठवितो, याची खात्री केली नाही.
त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा चुलत भावाशी संपर्क झाल्यावर चुलत भावाने आपण असे काही मेसेज केले नसल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
......
अशी घ्या काळजी...
* अशाप्रकारे सायबर चोरट्यांकडून फसवणूक झाल्याप्रकरणी पुण्यात पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.
* लोकांनी डीपीवर जरी आपल्या नातेवाइकांचा फोटो दिसला तरी तो नक्की त्यांचाच नंबर आहे का? याची खात्री करावी.
* ज्यांना पैसे पाठवायला सांगितले, ते कोण आहेत, ते बँक खाते कोणाचे आहे, याची अगोदर खात्री करावी.
* प्रत्यक्ष संपर्क साधून आपण ज्याला पैसे पाठवितो, ती तीच व्यक्ती आहे, याची खात्री पैसे पाठविण्यापूर्वी करावी.
- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे