पुणे : आज दुपारपासून पुण्यात पावसाने जाेरदार हजेरी लावली. इतक्या दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पाऊस आल्याचा आनंद एकीकडे पुणेकरांना हाेत असताना दुसरीकडे पाणी तुंबून वाहतूक काेंडी झाल्याने मनस्ताप देखील सहन करावा लागला. आज झालेल्या पावसामध्ये पुण्यातील 42 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना समाेर आल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई झाली नसल्याचे समाेर आले आहे.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा पाऊस यंदा लांबला. जूनचा महिना संपत आला असला तरी सकारात्मक पाऊस झाला नव्हता. पुण्याचे तापमान जूनमध्ये देखील वाढलेलेच हाेते. त्यामुळे पुणेकर पावसाची आतुरतेने वाट पाहत हाेते. अशातच आज दिवसभर शहरातील विविध भागात पावसाच्या जाेरदार सरींनी हजेरी लावली. पुण्याच्या उपनगरांमध्ये जाेरदार पाऊस झाला. मान्सूनच्या या पहिल्याच पावसात शहर व उपनगरातील 42 ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली.
दरम्यान आज दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने मान्सून खऱ्या अर्थाने सुरु झाल्याचे मानले जात आहे. जूनच्या सुरुवातील काही दिवस पाऊस झाल्यानंतर पावसाने शहरात चांगलीच दडी मारली हाेती. आज अचानक सुरु झालेल्या पावसामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली.