पुणे महापालिकेच्या नगरसेवक-अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय सुविधांवर ४६ कोटी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 09:32 PM2020-01-07T21:32:44+5:302020-01-07T21:33:54+5:30
वैद्यकीय सहाय्य योजनेंतर्गत शहरातील १७ हजार २७४ कुटुंबांना साहाय्य
पुणे : शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेंतर्गत शहरातील १७ हजार २७४ कुटुंबांना साहाय्य करणाऱ्या महापालिकेने, आजी माजी नगरसेवक व मनपा सेवकांवर डिसेंबर,२०१९ अखेर ४६ कोटी १७ लाख ७३ हजार ८२५ रूपये खर्च केले आहेत. अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेतून हा खर्च करण्यात आला असून, आता निधी कमी पडल्याने स्थायी समितीच्या बैठकीत वर्गीकरणातून याकरिता १० कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पालिकेच्या सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेसाठी ४६ कोटी, ६० लाख २० हजार १२५ रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती़. यामध्ये वर्गीकरणातून उपलब्ध केलेल्या निधीचाही समावेश आहे़ दरम्यान यापैकी ९९ टक्के निधी डिसेंबर,२०१९ अखेरपर्यंतच खर्च झाला आहे़.
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेकरिता ३८ कोटी ६४ लाख रूपये निधीचे वैद्यकीय साहाय्य करतानाच, यादरम्यान पालिकेचे विद्यमान नगरसेवकांच्या वैद्यकीय उपचारांवर १ कोटी ६६ लाख १५ हजार ६७८ रूपये, माजी नगरसेवकांच्या वैद्यकीय उपचारावर ९९ लाख ८२ हजार ७२२ रूपये ३१ डिसेंबर,२०१९ अखेर खर्च झाले आहेत़
याचबरोबर पुणे महापालिकेच्या सेवक वर्गावर व सेवानिवृत्त सेवकांवर ३४ कोटी ९९ लाख,९४ हजार,४८७ रूपये, पीएमपीएमएल आजी माजी सेवक वर्गावर ५ कोटी ५२ लाख, १६ हजार ९३८ रूपये व शिक्षण मंडळ आजी माजी सेवकांवर २ कोटी ९९ लाख ६४ हजार रूपये खर्च झाले आहेत.