पुणे : दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे २४ हजार वाहनधारकांना चांगलेच महागात पडले आहे. वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास ४७ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार पाचशे रुपयांचा दंड केला. मोटार वाहन कायद्यात नवी तरतूद करण्यात आली त्यानुसार १ हजार रुपये दंड करण्यात आले. तसेच तो वाहनधारक दुसऱ्यांदा मोबाईलवर बोलताना आढळला तर त्याला ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद केली आहे. मात्र नव्या नियमानुसार एकही वाहनधारक आढळले नाही.
मोटार वाहन कायद्याच्या नव्या तरतुदीत दंडाची रक्कम वाढविण्यात आली. मात्र तरी देखील अनेक वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करीत दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे सुरूच ठेवले आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी अद्याप एकालाही नव्या दंडानुसार कारवाई केलेली नाही. करण्यात आलेली कारवाई ही १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आलेली आहे.
पोलीस नाही म्हणून बोलला पण कॅमेरात टिपला
रस्त्यावर वाहतूक पोलीस नसल्याचे पाहून अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. मात्र शहरात विविध चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे त्यांच्यावर कारवाई करणे सोपे झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, सिग्नल ब्रेक करणे, विना हेल्मेट वाहन चालविणे आदी प्रकारचे गुन्ह्यावर कारवाई केली गेली.
हेल्मेटचा नियम नावालाच :
दुचाकीस्वार विना हेल्मेट असेल तर त्याला एक हजार रुपयांचा दंड आहे. मात्र पुणेकरांचा हेल्मेटला विरोध असल्याने अनेकजण हेल्मेट न घालताच दुचाकी चालवितात. कोणत्यातरी सिग्नलच्या सीसीटीव्हीत जर दुचाकीस्वार विना हेल्मेट आढळला तर त्याला दंड आकारला जातो. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.