लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आठ वर्षांनंतर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे या पाच जणांवर दोषारोप निश्चित केले आहेत. गुन्हा कबूल आहे का, असे विचारले असता आरोपींनी गुन्हा नाकारला. त्यावर ३० सप्टेंबरला सरकार व बचाव पक्षातर्फे कागदपत्रे सादर केली जाणार आहेत. त्यामुळे खटला सुरू होण्यास गती मिळणार आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयापुढे बुधवारी ही सुनावणी झाली. कोरोनाचे कारण सांगून आरोपींनी वकील व नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस पुन्हा मुदत देण्याची विनंती कोर्टाला केली. मात्र, कोर्टाने पुन्हा मुदतवाढ मिळणार नसल्याचे सांगितले.
आरोपी अंदुरे, तावडे, कळसकर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर होते, तर आरोपी पुनाळेकर व भावे प्रत्यक्ष उपस्थित होते. सुनावणीच्या वेळी आरोपींचे वकील ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले, की शरद कळसकर याच्याशी सात दिवसांत बोलणे झालेले नाही. पुढच्या तारखेला त्याला न्यायालयात हजर केले जाईल. त्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील अडचणींमुळे औरंगाबाद कारागृहात असलेला अंदुरे आणि आर्थर रोड कारागृहात असलेला कळसकर या दोघांना पुण्यातील येरवडा कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
कट रचणे, हत्येचा आरोप
- डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ ला हत्या झाली. या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात तावडे, अंदुरे, कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.
- ॲड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.