पतसंस्था अध्यक्षाला ५ दिवसांचा कारावास; पतसंस्थेला ठोठावला १० हजार रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:29 PM2018-02-06T13:29:09+5:302018-02-06T13:34:48+5:30
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेला मंचाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर पतसंस्थेच्या अध्यक्षाला पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
पुणे : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेला मंचाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर पतसंस्थेच्या अध्यक्षाला पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य एस. के. पाचारणे आणि सदस्य एस. जे. दुनाखे यांनी हा आदेश दिला आहे.
पतसंस्थचे अध्यक्ष मधुकर पाचपांडे (रा. प्रेस्टीज कॉम्प्लेक्स, टेल्को रोड, चिंचवड स्टेशन) यांना साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पतसंस्थेत तक्रारदारांनी रक्कम गुंतवली होती. परंतु, ज्या वेळेस तक्रारदार रक्कम काढण्यास गेले त्या वेळेस तक्रारदारांना रक्कम परत मिळाली नाही. त्यानंतर तक्रारदार सुरेश व्यंकोबा पिसे आणि निर्मला सुरेश पिसे (रा. गंगानगर, आकुर्डी), सागर चंद्रकांत खटावकर, पूनम सागर खटावकर (दोघेही रा. माळीनगर, देहूगाव) या दोन दाम्पत्यांनी पतसंस्थेविरोधात ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
त्यावर मंचाने दि. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी निकाल दिला. त्यामध्ये पतसंस्थेला ९ टक्के व्याजाने १० लाख ३० हजार ७४३ रुपये देण्याचे आदेश मंचाने दिला होता. त्याबरोबरच दहा हजारांची नुकसानभरपाई आणि ३ हजार रुपये तक्रार अर्जाच्या खर्चापोटी द्यावेत असेही निकालात नमूद करण्यात आले होते.