जिल्ह्यातील ५ हजार ७६० सैनिक बजावणार मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 05:57 PM2019-04-12T17:57:37+5:302019-04-12T17:58:36+5:30
सीमावर्ती भागात देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना काही कारणास्तव मतदान करता येत नाही
पुणे : देशाच्या सीमेवरील सैनिकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून प्रथमच ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जात आहे. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघातील एकूण ५ हजार ७६० सैनिकांनी जिल्हा निवडणूक कार्यालयात यासाठी नोंदणी केली आहे. त्यात बारामतीमध्ये सर्वाधिक २ हजार २५५ सैनिक मतदार आहेत.
देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. मात्र, सीमावर्ती भागात देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना काही कारणास्तव मतदान करता येत नाही. पोस्टाने पाठविलेली मतपत्रिका मतमोजणीच्या तारखेपर्यंत पोस्टाने प्राप्त होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या मदतीने ऑनलाईन मतपत्रिका पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मतपत्रिका ऑनलाईन पाठविल्यामुळे सैनिकांना तात्काळ मिळतील. तसेच मतदान व मतमोजणी यात एक महिन्याचा कालावधी असल्याने पोस्टाने मतपत्रिका वेळेत पोहचणार आहेत. त्यामुळे सर्व सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यातच सध्या पुणे, बारामतीसह शिरूर व मावळ मतदार संघातील उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यामुळे या मतदार संघात येणाऱ्या सैनिक मतदारांना लवरकरच त्यांच्या कामाच्या ठिकाणी सीमावर्ती भागात मतपत्रिका पाठविल्या जाणार आहेत.
शिरूर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या एकट्या आंबेगाव विधानसभा मतदार संघात ६४३ सैनिक मतदारांनी मतदानासाठी नोंदणी केली आहे. तर बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर विधानसभा मतदार संघात ६३८ सैनिक मतदार असून बारामती विधानसभा ५८६ सैनिक मतदार आहेत.
मतदार संघ निहाय सैनिक मतदारांची आकडेवारी
पुणे: वडगाव शेरी-४३७, शिवाजीनगर-९९ , कोथरूड-७६, पर्वती-४४, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड-९६, कसबा पेठ-३३.
बारामती : दौंड-३०८, इंदापूर-२७७, बारामती-५८६, पुरंदर-६३८, भोर-३०४, खडकवासला-१४२.
शिरूर : जुन्नर-२७६, आंबेगाव-६४३, खेड आळंदी-३५३, शिरूर-४२४, भोसरी-१४४, हडपसर-२०५.
मावळ : पनवेल-१७०, कर्जत-६३, उरण-४१, मावळ-११२, चिंचवड-१५६, पिंपरी-१३३.