पुणे महापालिकेला दरमहा ६२ लाखांचा ‘जल’दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:00 AM2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:05+5:30
मंजुर कोट्यापेक्षा तीन ते साडेतीन टीएमसी अधिक वापर
विशाल शिर्के -
पुणे :जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या कोट्यानुसार महानगरपालिकेचा वापर होत नसल्याने जलसंपदा विभागाने मंजुर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरावर जल‘दंड’ उगारला आहे. गेल्या दोन वर्षांत महापालिकेला सुमारे १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. म्हणजेच महापालिकेला दरमहा सरासरी, ६२ लाख ३३ हजार ८०६ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मापदंडानुसार शहराला दररोज ६३५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय सप्टेंबर २०१७मध्ये दिला आहे. म्हणजेच त्यानुसार वार्षिक ८.१९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी होते. खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. सध्या महापालिका १३५० ते १४५० एमएलडी पाणी उचलत आहे. म्हणजेच दररोज १३५ ते १४० कोटी लिटर पाण्याचा वापर होत आहे. या दराने वार्षिक १७.५० ते १८.५० टीएमसी पाणी पुणे शहराला लागेल.
मंजूर कोट्या पेक्षा अधिक पाणी वापरल्यास जलसंपदा विभाग दंड ठोठावते. म्हणजेच साडेअकरा टीएमसी हा कोटा धरुन दंडाची आकारणी होते. नियमानुसार मंजूर कोट्या पेक्षा १५ टक्के अधिक पाणी वापर झाल्यास दंड आकारला जात नाही. म्हणजेच १३.२२ टीएमसी पाणीवापर दंडाच्या कक्षेबाहेर येतो. मात्र, त्यापुढे १६.१ टीएमसी पर्यंत दीडपट आणि त्या पुढे वापर झाल्यास दुप्पट दंड आकारला जातो.
जलसंपदाकडून जुलै ते जून या कालावधीत दर दोन महिन्यांनी महापालिकेला पाणीपट्टी पाठविली जाते. महापालिकेने जुलै ते जून २०१७-१८ या कालावधीत १८.७८ टीएमसी पाण्याचा वापर केला होता. म्हणजेच ५.५६ टीएमसी पाण्यावर दंड आकारण्यात आला. तर, जुलै ते जून २०१८-१९मधे १७.१७ टीएमसी पाणी वापरले. त्यामुळे ३.९५ टीएमसी पाण्यावर दंड आकारण्यात आला आहे. या दोन्ही वर्षांचा मिळून १४ कोटी ९६ लाख ११ हजार ३४४ रुपयांचा दंड पालिकेला ठोठावला आहे.
------------
अधिकृत पाणीवापरासाठी महापालिका २८.३२ लिटरला मोजते ६० पैसे
जलसंपदा विभाग महापालिकेला पिण्याच्या अधिकृत पाणी वापरासाठी २८.३२ लिटरमागे (एक घनमीटर) ५० पैसे मोजते. तर, औद्योगिक वापरासाठी ९.६० पैसे प्रति घनमीटक आकारले जातात. जुलै २०१९ पासून त्यात २० टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणेज पिण्याच्या पाण्यासाठी ६० पैसे आणि औद्योगिक पाण्यासाठी ११.५२ पैसे मोजावे लागतील. मंजुर कोट्या पेक्षा जास्त पाणी वापरल्यास या आकाराच्या दीड ते दुप्पट दराने पैसे मोजावे लागतात.