पुण्यात हनी ट्रॅप, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन 67 लाख उकळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 03:18 PM2022-07-29T15:18:54+5:302022-07-29T15:20:04+5:30
बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन...
-किरण शिंदे
पुणे: सोशल मीडियावर झालेली ओळख एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. या तरुणाला एका तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून तब्बल 67 लाख रुपये उकळले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार जानेवारी 2020 पासून वेळोवेळी घडला.
चेतन रवींद्र हिंगमिरे (रा. काळेपडळ, हडपसर), निखिल उर्फ गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे (वय 27, गाडीतळ हडपसर) आणि एका तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरील दोन आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करून आणि आरोपी तरुणीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीतूनच दोघांमध्ये शरीर संबंध आले. दरम्यान या सर्व प्रकारानंतर आरोपी तरुणीने आपल्या इतर दोन साथीदारांसोबत मिळून फिर्यादीला ब्लॅकमेल केले. अल्पवयीन असतानाही बलात्कार केला, यातून गर्भधारणा झाली आहे असे सांगून पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली.
प्रकरण मिटवायचे असतील तर पैसे द्यावे लागतील असे सांगून फिर्यादी कडून तब्बल 67 लाख 5 हजार 573 रुपये घेतले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी खातरजमा करून गुन्हा दाखल केला असेल अधिक तपास सुरू आहे